भामा आसखेडमधून पिंपरी-चिंचवडसाठी जलवाहिनी टाकण्याकरिता 162 कोटींचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरासाठी खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून पाणी घेतले जाणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासाठी खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून पाणी घेतले जाणार आहे. जलसंपदा विभागाने शहरासाठी प्रतिदिन 168 दशलक्ष लिटर अर्थात एमएलडी पाणी कोटा मंजूर केला आहे. त्यासाठी धरणापासून चिखलीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. यामुळे चिखलीसह तळवडे, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, दिघी, बोपखेल, भोसरीचा काही भाग, मोशी प्राधिकरण आदी भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या जलवाहिनीसाठी 162 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भामा आसखेड धरणातून जलवाहिनीद्वारे शहरात पाणी आणले जाणार आहे. त्यासाठी धरणातील जॅकवेलपासून नवलाख उंबरे गावापर्यंत आणि तेथून देहू गावाजवळील इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यापर्यंत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. यासाठी अनुक्रमे 61 व 101 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. चिखली येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू आहे. शिवाय, देहूजवळ बंधारा बांधण्यात येणार आहे. या बंधाऱ्यापासून चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता तीनशे दशलक्ष लिटर आहे. त्यातील शंभर दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पात आंद्रा धरणातूनही पाणी आणण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाने आंद्रा धरणातून प्रतिदिन शंभर दशलक्ष लिटर पाणी मंजूर केले आहे. हे पाणी इंद्रायणी नदीद्वारे देहू बंधाऱ्यापर्यंत आणले जाणार आहे. तेथून जलवाहिनीद्वारे चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पात आणले जाईल व पाणी वितरण केले जाईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागरिक म्हणतात...

आमच्या सोसायटीत महापालिकेचे पाणी येत नाही. त्यासाठी दररोज टॅंकर मागवावे लागते. दहा हजार लिटर क्षमतेच्या टॅंकरसाठी बारा हजार रुपये एका वेळी मोजावे लागतात. पाण्याची व्यवस्था आम्ही करू, असे बिल्डरने सांगितल्यामुळे महापालिकेने त्यांना बांधकाम परवाना व पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. आता बिल्डर पाणी देत नाही. महापालिका म्हणते आम्ही सध्या पाणी देऊ शकत नाही. यामुळे पाणी विकत घ्यावे लागत आहे. आंद्रा किंवा भामा आसखेड धरणातून पाणी आल्यास आम्हाला महापालिकेकडून पाणी मिळेल, असे चिखली, मोशी, चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे संजीवन सांगळे यांनी 'सकाळ'ला सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 162 crore sanctioned for pipeline from Bhama Askhed Dam to Pimpri Chinchwad city