esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये १६९ शाळांनी नाकारले नर्सरी, केजीचे प्रवेश!

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये १६९ शाळांनी नाकारले नर्सरी, केजीचे प्रवेश!}

आरटीईअंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी अनेक शाळांनी इयत्ता पहिली हाच एन्ट्री पॉइंट ठेवला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये १६९ शाळांनी नाकारले नर्सरी, केजीचे प्रवेश!
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : आरटीईअंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी अनेक शाळांनी इयत्ता पहिली हाच एन्ट्री पॉइंट ठेवला आहे. या प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या १८२ खासगी इंग्रजी शाळांपैकी केवळ १३ शाळांनीच तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी २०० जागा सोडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. परिणामी पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची मोठी निराशा झाली आहे. दुसरीकडे, मोशीतील कर्मावती इंग्लिश मीडियम शाळेने पहिलीची विद्यार्थीसंख्या दाखवली नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थीसंख्या किती आहे, हे अस्पष्ट आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात आरटीई प्रवेशासाठी यंदा तीन हजार ८६० जागा उपलब्ध आहेत. या नोंदविलेल्या प्रत्येक शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्ग भरले जातात. परंतु, १८२ पैकी १६९ शाळांनी नर्सरी व केजीचे प्रवेश नाकारले आहेत. आरटीईच्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पालक घराजवळील नर्सरी, केजी एन्ट्री पॉइंटच्या शाळांचा शोध घेत आहेत. परंतु, अनेक पालकांना या शाळाच सापडल्या नाहीत. परिणामी सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच आरटीईच्या शाळांमध्ये प्रवेश अर्ज भरता येणार आहे. तीन हजार ६६० जागांवर पहिलीच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. केवळ २०० जागांवरच नर्सरी व केजीच्या मुलांना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे वर्षभर आरटीईअंतर्गत प्रवेश मिळण्याच्या आशेने दुसऱ्या कोणत्याही शाळेत पाल्याचा प्रवेश न केलेल्या पालकांची मोठी पंचाईत झाली आहे. तसेच, शाळांनी अचानक बदललेल्या ‘एन्ट्री पॉइंट’ची पालकांना कल्पना नसल्याने त्यांची अडचण होणार आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पालक म्हणतात.... 
सिद्धार्थ सोनटक्के (गांधीनगर) : माझा मुलगा चार वर्षांचा असून त्याला आरटीईअंतर्गत प्रवेश मिळावा, यासाठी मी गेल्या वर्षापासून प्रयत्न करत आहे. परंतु, गांधीनगर या भागातील शाळांनी आरटीई प्रवेशासाठी पूर्व प्राथमिकचे वर्गच दाखविले नाहीत. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. 

विजय लंके (मोशी) : आरटीई पोर्टलवर प्रवेशासाठी पूर्व प्राथमिकच्या जागा कमी दिसून येत आहेत. आता तीन वर्षांच्या मुलाने कुठे प्रवेश घ्यायचा. या शाळेत दोन वर्षांपूर्वी नर्सरी व केजीचे वर्ग भरलेले आहेत. प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची मोठी निराशा झाली आहे. 

सुनील ढवळे (संत तुकारामनगर) : शाळांनी नर्सरीपासून प्रवेश दिले पाहिजेत. शिक्षण विभागाने शाळांचे ‘एन्ट्री पॉइंट’ तपासून घ्यावेत. 

केवळ आर्थिक परतावा द्यावा लागू नये, म्हणून राज्य सरकार शाळांचा आरटीई प्रवेशाचा एन्ट्री पॉइंट पहिलीपासून करण्यास मान्यता देत आहे. त्यामुळे गरीब पालकांना खासगी नर्सरी, केजी, शिशुवर्गात भरमसाट पैसे भरून प्रवेश घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे नर्सरी, केजी वर्ग संलग्न असणाऱ्या सर्व शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश द्यावा. अन्यथा शिक्षणमंत्र्यांनी ३ ते ५ वयोगटातील मुला-मुलींना शिक्षणाचा हक्क लागू नसल्याचे जाहीर करावे. 
- हेमंत मोरे, अध्यक्ष, आरटीई पालक संघ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उन्नत केंद्र पहिली जागा नर्सरी व केजी जागा पहिलीसाठी शाळा नर्सरी व केजीच्या शाळा 
पिंपरी १,३७० ९६ ६६
आकुर्डी २२९० १०४ ११६