पिंपरी : कोरोनाचा एप्रिल महिन्यात २५९ जणांना संसर्ग, मृत्यूदर शून्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient
पिंपरी : कोरोनाचा एप्रिल महिन्यात २५९ जणांना संसर्ग, मृत्यूदर शून्य

पिंपरी : कोरोनाचा एप्रिल महिन्यात २५९ जणांना संसर्ग, मृत्यूदर शून्य

पिंपरी - कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत लागू केलेले सर्व निर्बंध राज्य सरकारने (State Government) एक एप्रिलपासून रद्द केले. मास्क (Mask) वापरण्याचा निर्णयही ऐच्छिक ठेवला आहे. या एक महिन्याच्या कालावधीचा शहरातील आढावा घेतला असता दिवसाला सरासरी नऊ रुग्ण (Patients) आढळले आहेत. मात्र, त्यात गंभीर रुग्णांची संख्या शून्य असून, महिनाभरात एकही मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, ही जमेची बाजू आहे.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने टास्क फोर्सने सूचना केल्यास पुन्हा एकदा निर्बंध लागू केले जाऊ शकतात, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. १) पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना केले आहे. मात्र, कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने कोरोना प्रतिबंधक नियम एक एप्रिलपासून सरकारने शिथिल केले आहेत. मास्क वापरणे ऐच्छिक केले आहे. त्यामुळे बहुतांश जण मास्क वापरत नसले तरी काहीजण मात्र मास्क वापरताना दिसत आहेत.

गंभीर रुग्ण शून्य

गेल्या महिनाभरात शहरात आढळलेल्या २५९ रुग्णांमध्येही एकही गंभीर रुग्ण नाही. कोणीही रुग्णालयात दाखल नाही. सौम्य लक्षणे असलेली रुग्ण असल्याने त्यांच्यावर गृहविलगीकरणात ठेवले आहे. या महिन्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नसून मृत्यूदर शून्य राहिला आहे.

लग्नसोहळे बिनधास्त

सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यांवर असलेल्या उपस्थितीच्या संख्येचे बंधनही आता राहिलेले नाही. अंत्यविधी वा अन्य सोहळ्यांवरही निर्बंधही हटवले आहेत. त्यामुळे अनेक जण बिनधास्तपणे विनामास्क उपस्थिती लावत असल्याचे चित्र आहे. मात्र, काही जण स्वतःची काळजी म्हणून मास्क वापरतानाही दिसत आहेत.

सार्वजनिक ठिकाणी आवश्यक

मास्क वापरणे ऐच्छिक असले तरी, महापालिका मुख्यालयासह सर्व क्षेत्रीय कार्यालये, करसंकलन कार्यालये, रुग्णालये, दवाखान्यांमध्ये मास्क आवश्यक आहे. पीएमपी व एसटी बस, मेट्रो अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करताना मास्क लावण्याबाबत सांगितले जाते. काही बॅंकाही मास्कशिवाय प्रवेश देत नाहीत.

प्रोटेक्शन म्हणून मास्क

चिंचवड स्टेशन परिसरातील मॉलमध्ये आई-वडिलांसमवेत आलेल्या व मास्क घातलेल्या अंकिताला विचारले असता ती म्हणाली, ‘कोरोना कमी झालेला असला तरी प्रोटेक्शन म्हणून मी मास्क वापरते आहे. मॉल व अन्य गर्दीच्या ठिकाणी तो वापरलाच पाहिजे. तिच्या लहान भावानेही मास्क लावलेला होता. यावरून मास्कबाबत तरुणाईमध्येही जागृती असल्याचे दिसत आहे.

माझा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. आमच्याकडे अनेक जण भाजी खरेदीसाठी येतात. आम्हीही मार्केटमध्ये खरेदीसाठी जात असतो. गर्दीमध्ये काळजी घेणे गरजेचे आवश्यक आहे. म्हणून मास्क वापरला आहे.

- नामदेव गोळे, चिखली

मी गॅरेजवर कामाला आहे. एका गाडीचे स्पेअरपार्ट आणण्यासाठी कुदळवाडीला चाललोय. आमच्याकडे अनेक ग्राहक येतात, गाड्या दुरुस्तीसाठी येतात. त्यांना कोणीकोणी हात लावलाय हे माहिती नसतं. त्यामुळे आम्ही सर्व कारागीर मास्क वापरतो.

- योगेश चव्हाण, भोसरी

दृष्टीक्षेपात कोरोना (एक ते ३० एप्रिल २०२२)

  • २०,९९८ - तपासले

  • २५९ - संसर्ग

  • २७६ - डिस्चार्ज (एक एप्रिलपूर्वी संसर्ग झालेल्या ९० रुग्णांसह)

  • ६३ - सक्रिय

  • ०० - मृत्यू

  • ६३,९११ - लसीकरण

Web Title: 259 Corona Patients Found In Pimpri In April Month

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top