सात महिन्यात पिंपरी-चिंचवडमध्ये 36 लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

  • एका आमदारासह 26 नगरसेवकांची यशस्वी मात
  • विद्यमान तीन व माजी सहा नगरसेवकांचा मृत्यू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग सुरू होऊन सात महिने उलटली. या कालावधीत सर्व सामान्य नागरिकांसह 36 लोकप्रतिनिधींनाही बाधा झाली. यातील एका आमदारासह 26 नगरसेवकांची यशस्वी मात केली आहे. ते पुन्हा जोमाने सक्रिय झाले आहेत. मात्र, विद्यमान तीन व माजी सहा नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादूर्भाव मार्च महिन्यात सुरू झाला. राज्यातील पहिला व दुसरा रुग्ण पुण्यात नऊ मार्चला आढळला. हे दाम्पत्य परदेशातून विमानाने आले होते.  त्यांचेच सहप्रवासी असलेले पिंपरी-चिंचवड शहरातील तीन जण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दहा मार्चला दाखल झाले. तिघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि कोरोनाने शहरात शिरकाव केला. आतापर्यंत ही संख्या 85 हजारांवर पोचली आहे. मात्र, त्यावर मात केलेल्यांची संख्या 79 हजारांवर गेली आहे. जवळपास दीड हजार नागरिकांचा बळी गेला आहे. सध्या साडेचार हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी साडेतीन हजार रुग्ण महापालिका रुग्णालयांत उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्ण होम आयसोलेट व खासगी रुग्णालयात आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले. अनेकांचा रोजगार गेला. त्यांच्या मदतीसाठी काही लोकप्रतिनिधी धाऊन आले. महापालिकेच्या अनेक विद्यमान नगरसेवकांनी जनसंपर्क कार्यालयातून अन्नधान्य वाटप, भाजीपाला वाटपाचे काम केले. सुरुवातीला औषध फवारणी, रुग्णांना बेड मिळवून देणे, औषधे मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. तसेच स्वत: पीपीई किट घालून थर्मल स्कॅनिंग करण्याचे कामसुद्धा केले. रुग्णालयास व्हेंटिलेटरपासून ऑक्सिजन सिलिंडरपर्यंत वैद्यकीय मदत केली. हे करत असताना एक आमदार व 29 नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 26 नगरसेवकांसह आमदार महेश लांडगे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तसेच, दुर्दैवाने तीन नगरसेवकांना जीव गमवावा लागला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनावर मात केलेले नगरसेवक, नगरसेविका

  • भाजप : चंदा लोखंडे, शारदा सोनवणे, कमल घोलप, सीमा सावळे, आशा शेंडगे, सुजाता पालांडे, निर्मला कुटे, साधना मळेकर, भीमाबाई फुगे, स्वीनल म्हेत्रे, नीता पाडाळे, उत्तम केंदळे, शैलेश मोरे, विलास मडिगेरी, बाबू नायर, तुषार कामटे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, सागर अंगोळकर, शशिकांत कदम.
  • शिवसेना : राहुल कलाटे, निलेश बारणे.
  • राष्ट्रवादी : नाना काटे, शीतल काटे, डब्बू आसवानी, अनुराधा गोफने. 

बळी गेलेले नगरसेवक

लॉकडाउन काळात गोरगरिब जनतेला सुमारे 15 लाख रुपयांचे अन्नधान्य वाटप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिखलीतील नगरसेवक दत्तात्रेय साने यांना कोरोनाची बाधा झाली. त्यात त्यांचा बळी घेतला. राष्ट्रवादीचेच आकुर्डीतील नगरसेवक जावेद शेख यांचाही कोरोनामुळेच मृत्यू झाला. भाजपचे दिघीतील नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचाही कोरानामुळे मृत्यू ओढावला. 

बळी गेलेले माजी नगरसेवक

जनसेवा करताना लोकांच्या संपर्कात आल्याने माजी नगरसेवक रंगनाथ फुगे, साहेबराव खरात, एकनाथ थोरात, लक्ष्मण गायकवाड, सुलोचना बडे, हनुमंत खोमणे यांना संसर्ग झाला. त्यात त्यांचा बळी गेला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 36 corporators corona infected in seven months at pimpri chinchwad