पिंपरी-चिंचवड शहरात ७५,००० भंगार वाहने सुसाट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

पंधरा वर्षांनंतर जुन्या वाहनांची वयोमर्यादा संपते. अशा धोकादायक वाहनांचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे. मात्र, शहरात १५ वर्षांवरील वाहन रस्त्यावर चालवूनही नूतनीकरण न करता पर्यावरण कर बुडवणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बऱ्याच जणांना या कराविषयी अनभिज्ञता आहे.

पिंपरी - पंधरा वर्षांनंतर जुन्या वाहनांची वयोमर्यादा संपते. अशा धोकादायक वाहनांचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे. मात्र, शहरात १५ वर्षांवरील वाहन रस्त्यावर चालवूनही नूतनीकरण न करता पर्यावरण कर बुडवणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बऱ्याच जणांना या कराविषयी अनभिज्ञता आहे. नागरिक नूतनीकरणाला ‘खो’ देत पर्यावरणाला बाधा पोचवून सुसाट वाहने रस्त्यावर चालवीत आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी व चारचाकी मिळून तब्बल ७५ हजारांहून अधिक भंगार वाहने सध्या बिनदिक्कत पिंपरी-चिंचवड शहरात फिरत आहेत. 

शहरात दररोज लाखो वाहने रस्त्यावर धावत आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार पंधरा वर्षानंतर वाहनांची वयोमर्यादा ओलांडल्यानंतर दर पाच वर्षांनी वाहनांचे नूतनीकरण करुन कर भरणे आवश्यक आहे. सध्या आरोग्याचे प्रश्न देखील ऐरणीवर आहेत. वाहन अनफिट असेल तर त्वरित कार्यवाही करुन स्क्रॅप करणे अत्यावश्यक आहे. वाहनांची वयोमर्यादा संपुष्टात आल्यास अशी वाहने आरटीओने कारवाईमध्ये थेट जप्त करायला हवीत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परिणामी, ही मोहीम शहरभर तीव्र व कडक पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. सरकारचा महसूल देखील मोठ्या प्रमाणात बुडत आहे. सध्या प्रामाणिकपणे कर भरणारे कमी आणि नियमांचे उल्लंघन करणारे अधिक अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. अशा वाहनांचा अपघात झाल्यास वीमा क्लेम देखील होत नाही. बऱ्याचदा घरातील जुनी वाहने ज्येष्ठमंडळी चालवितात, तर नवी वाहने युवक दामटताना दिसतात. त्यामुळे वर्षानुवर्षे नूतनीकरण कालावधी संपूनही सर्रासपणे नियमांचे उल्लंघन झालेले दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवडकरांनो मास्क घालूनच बाहेर पडा; नाही तर दंड!

नागरिकांनी पर्यावरण कर व वाहनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी जागरूक असणे गरजेचे आहे. अपघात झाल्यास नागरिकांना जाग येते. वेळोवेळी अशा वाहनांवर कारवाई करून वाहने जप्त केली जात आहेत. दंडही आकारला जातो.
- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

पेट्रोल व डिझेलच्या बीएस फोर व बीएस सिक्सच्या वाहनांमध्ये लॅमडाचे (विविध घटक) प्रमाण तपासले जाते. हे प्रमाण ०.९७ पर्यंत असायला हवे. परंतु, जुन्या वाहनांचे प्रदूषण मानवी आरोग्यासाठी घातक आहे.    
- पांडुरंग सायकर, सायकर सर्व्हिस पीयूसी सेंटर, चिंचवडगाव

काय आहे नूतनीकरण प्रक्रिया
www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘वाहन’वर क्लिक केल्यास अर्जाची प्रक्रिया करावी लागते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध आहे. आरटीओ कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. वाहनाचे वय पंधरा वर्ष झाल्यानंतर त्यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज करणे अत्यावश्यक आहे. अर्जदाराकडे आरटीओ इन्सपेक्टर जाऊन वाहनांची तपासणी करतो. 

तपासणीनंतर वाहन भंगारात जाते. वाहनांचे काही महागडे व सुस्थितीत असलेले भाग चांगले असल्यास त्यांना पुढील पाच वर्षांसाठी नूतनीकरण मिळते. त्यानंतर वाहन भंगार झाल्यास चासीचा तुकडा काढून नोंद केली जाते.

स्क्रॅप वाहनांचा दंड

 • २००० - मोटार
 • ३००० - पेट्रोल कार
 • ३५०० - डिझेल कार

प्रलंबित नूतनीकरण वाहने (१ जानेवारी २००४ ते ३१ डिसेंबर २००६ मधील नोंदणीकृत वाहने)

 • २२४९९ - चारचाकी
 • ५२९५० - दुचाकी
 • ७५४४९ - एकूण

नूतनीकरण झालेली वाहने १ जानेवारी २०२० ते १६ फेब्रुवारी २०२१ कालावधीतील रखडलेले

 • ३०३२ - चारचाकी
 • १७४७ - दुचाकी
 • ५३ - इतर
 • ४८३२ - एकूण
 • १८६ - स्क्रॅप वाहने

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 75000 Scrap Vehicles on road in pimpri chinchwad city