PMP Bus : ‘पीएमपी’च्या ७६१ बस ‘नेटवर्क’च्या बाहेरच! लाइव्ह लोकेशन दिसेना

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) ‘आपली पीएमपीएमएल’ ॲप सुरू होऊन सात महिने झाले.
PMP Bus
PMP Bussakal
Updated on

- अविनाश ढगे

पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) ‘आपली पीएमपीएमएल’ ॲप सुरू होऊन सात महिने झाले तरी अजूनही ७६१ बसचे ‘लाइव्ह लोकेशन’ दिसत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, प्रवाशांना अनेक मार्गांवरील बससाठी ताटकळावे लागत आहे. सात महिन्यांनंतरही बस ऑनलाइन न केल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दींमध्ये ‘पीएमपी’चे एकूण ३८१ मार्ग आहेत. त्यावर साधारण १,७०० च्या आसपास बस दररोज धावतात. यापैकी ८००-८५० बस ठेकेदारांच्या, तर ७५०-८०० बस ‘पीएमपी’च्या धावतात. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने तिकिटासाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू केली आहे.

तसेच प्रवाशांना घरबसल्या बसचे ‘लाइव्ह लोकेशन’ दिसावे, ऑनलाइन तिकीट व पास काढता यावा, ऑनलाइन तक्रार करता यावी, म्हणून ‘आपली पीएमपीएमएल’ हे ॲप विकसित केले. १५ ऑगस्ट २०२४ पासून ते प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले असून आतापर्यंत दहा लाख ५१ हजार जणांनी ते डाउनलोड केले आहे.

ॲपमध्ये प्रवाशांना बसचे लाइव्ह लोकेशन दिसावे म्हणून पीएमपीने १,२६५ बसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग डिव्हाइस (व्हीएलटीडी) बसविले आहे. तर अजूनही ६८१ बसमध्ये ही यंत्रणा बसविलेली नाही. तर, १,२६५ पैकी ८५ बसमधील ही यंत्रणा बंद असल्याची स्थिती आहे.

  • १९४६ - एकूण बस

  • २७७ - सीएनजी बस

  • ४९० - इलेक्ट्रिक बस

  • १२२९ - डिझेल

  • ‘व्हीएलटीडी’ बसविलेल्या बस - १२६५

  • ‘व्हीएलटीडी’ न बसविलेल्या बस - ६८१

  • आपली पीएमपीएमएल ॲपवर दिसणाऱ्या बस - ११८५

  • व्हीएलटीडी बसवून पण ॲपवर न दिसणाऱ्या बस - ८५

  • ॲपवर न दिसणाऱ्या एकूण बस - ७६१

केंद्र सरकारच्या आदेशाचा विसर?

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टुरिस्ट टॅक्सी, बस आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग डिव्हाइस’ आणि ‘पॅनिक बटण’ बसविण्याची सक्ती केली आहे. परिवहन विभागानेदेखील १ जानेवारी २०१९ नंतरच्या सर्व प्रवासी वाहनांना ‘पॅनिक बटण’, ‘व्हेइकल ट्रॅकिंग डिव्हाइस’ बसविणे बंधनकारक केले आहे. पीएमपीच्या ताफ्यात सध्या एकूण १९४६ बस आहेत.

यातील २०१९ नंतर स्वमालकीच्या २३३ मिडीबस, ४०० सीएनजी अशा एकूण ६३३ बस आणि ठेकेदाराच्या ४९० इलेक्ट्रिक आणि आता नव्याने ८० सीएनजी बस दाखल झाल्या आहेत. २०१९ नंतर दाखल झालेल्या बहुतांश नवीन बसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग डिव्हाइस’ नाही किंवा बंद आहेत. त्यामुळे पीएमपी प्रशासनाला केंद्र सरकारच्या आदेशाचा विसर पडला आहे की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पीएमपीच्या जुन्या ३५० बस स्क्रॅप होणार असल्याने त्यामध्ये ‘व्हीएलटीडी’ यंत्रणा बसवली नाही. ज्या बसमध्ये ही यंत्रणा आहे, पण का सुरू नाही याची माहिती घेऊन त्या बस ऑनलाइन करण्याच्या सूचना देऊ.

- दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

ॲप सुरू होऊनही बस ऑनलाइन दिसत नसतील, तर हे पीएमपीएमएलचे अपयश आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेची हेळसांड सुरू आहे. नवीन बसमधील ‘व्हीएलटीडी’ बंद असतील तर आरटीओ कारवाई का करत नाही?

- संजय शितोळे, मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com