दिवाळी सण मोठा भेसळीला नाही तोटा!

सुवर्णा नवले 
Wednesday, 11 November 2020

  • तुपामध्ये बटाट्याचा किंवा रताळ्याचा गर

पिंपरी : दिवाळी सण असो अथवा घरातला नेहमीचा लागणारा किराणा. घरच्या घरीच भेसळीचे प्रयोग करून शंका दूर करा. समजा, तुम्ही  घरी खवा आणला तर तो पाण्यात उकळा, तो थंड करा. त्यात आयोडिनचे थेंब टाका. निळा रंग आल्यास स्टार्च आहे हे समजा. त्यानंतर तूप किंवा शुद्ध वनस्पती तुपामध्ये बटाट्याचा किंवा रताळ्याचा गर मिसळलेला असतो. त्यासाठी एका वाटीत चमचाभर तूप घेऊन गरम करा. हायड्रोक्‍लोरिक आम्ल त्यात ओतून चिमूटभर साखर टाका. ते हलवा. स्थिर करा. नारंगी रंगाचा थर तळात जमा झाला की भेसळ आहे असे समजा. असेच प्रयोग घरात करून भेसळीपासून दूर राहिल्यास नक्कीच आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिवाळी सणासुदीच्या तोंडावर प्रत्येकजण खरेदीमध्ये दंग आहे. याच काळात भेसळयुक्त माल बाजारात आणून मोठ्या प्रमाणावर खपवला जातो. त्यामुळे किराणामाल, मिठाई, दिवाळी फराळासह जीवनावश्‍यक वस्तूंमधील भेसळीपासून सावध राहणे गरजेचे आहे. कोरोनामुळे एकीकडे सर्वांच्या मनात धाकधूक आहे. प्रत्येकजण खरेदी करतानाही संसर्गाच्या भीतीने धास्तावलेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचीही चर्चा आहे. परिणामी, दिवाळीतला गोडवा घरात जपण्यासाठी मात्र भेसळ तपासणारी यंत्रणा शहरात तुटपुंजी आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी जागरूक राहून भेसळयुक्त पदार्थ टाळून दिवाळी निर्धास्त साजरी करणे गरजेचे आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात अन्न औषध प्रशासनाची स्वतंत्र यंत्रणा व कार्यालय नाही. सहा महिन्यांत बोटावर मोजण्याइतपत नमुने तपासणी करून दंड आकारलेला आहे. खाद्यपदार्थांचे काटेकोरपणे तपासणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. भेसळयुक्त पदार्थांमुळे शारीरिक व्याधी जडू शकतात. काही जणांना पोटाचे विकार, आतड्याला सूज येऊ शकते. मेटॅनील यलो रंगाच्या अतिरिक्त वापरामुळे कर्करोग होऊ शकतो. सर्रास चायनीजमध्ये हा पदार्थ वापरला जातो. अतिसेवनाने रक्‍तदाब वाढू शकतो. दुधातील सोडा व युरियामुळे आतड्यांचे विकार जडण्याची भीती असते. 

कशात काय भेसळ असू शकते

रवा - लोखंडी चुरा, मोहरी - धोतऱ्याचे बी, डाळ - मेटॅनील यलोसारखे रंग, धान्य - खडे, किडके धान्य, किडे, चहा पावडर - जुनी चहापाती वाळवणे, मटार फ्रोजन - रंग देणे, मिठाई - मेटॅनील यलो रंग, हळद - मेटॅनील यलो रंग, लाल तिखट - विटेचा चुरा, लाकडाचा भुसा, शहाजिरे - काळा लरंगाचे गवती बी, पीठी साखर - वॉशिंग सोडा, खवा-पनीर - पिष्ठमय पदार्थ, खाद्यतेल - खनिज तेल, केशर - मक्‍याच्या तुऱ्याचे तुकडे, मध - गुळाचे पाणी, धने पावडर - लाकडाचा चुरा, दूध - स्टार्च, पाणी, मीठ, ग्लुकोज, युरिया.

काय करायला हवे

खरेदी करताना कोणत्याही उत्पादनाची तारीख, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, बॅच क्रमांक, घटकांची माहिती, आयएसआय, एफपीओ मार्क असावे. मुदत सुरू व संपण्याची तारीख पाहणे. मिठाईचे पदार्थ शिळे न होता ते थंड ठिकाणी साठवलेले असायला हवेत. शाकाहारी पदार्थांवर हिरवा ठिपका, मांसाहारी पदार्थांवर लाल ठिपका हवा. प्रत्येक वस्तू व इतर पदार्थ वजन करून घ्यावेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: adulteration in groceries due to diwali festival