
Akurdi : आकर्षक दागिन्यांनी सजली बाजारपेठ
आकुर्डी : गणेशाला विविध प्रकारच्या दागिन्यांनी सजविता यावे, गणरायाबरोबरच गौरीही सजून जावी यासाठी सोने-चांदीच्या दागिन्यांसह स्वस्तातील तरीही आकर्षक अशा बेन्टेक्स तसेच नकली दागिन्यांची बाजारपेठेत रेलचेल झाली आहे. गौरीसाठी मंगळसूत्र, लक्ष्मीहार, बाजूबंद, कंबरपट्टा, नथ अशा प्रकरचे विविध दागिने उपलब्ध झाले आहेत.
गौरीचे मुखवटे व गौरीसाठीचे विविध प्रकारचे हार, लोखंडी स्टॅन्ड, कापडी व ‘पीओपी’चे तयार हातही उपलब्ध झाले आहेत. तसेच गौरीसाठी रेडिमेड साड्यांची अधिक क्रेझ यंदा दिसून येत आहे.
सध्या विविध दागिन्यांसह गौरीच्या आकर्षक मुखवट्यांनी बाजारपेठ सजली आहे. सामान्यांना परवडतील अशा किमतीचे बेन्टेक्समध्ये मोहनमाळ, बांगड्या, नथ, तोडे, मुकुट, बाजूबंद, गळ्यातला हार, कंबरपट्टेही उपलब्ध आहेत. गौरीची संपूर्ण मूर्तीही अनेक विक्रेत्यांनी आणली आहे.
गौरीचे दागिने
बोरमाळ : १०० रुपयांपासून सुरू
लक्ष्मी हार ; ५० रुपये जोडी
ठुशी : १०० ते ६०० रुपये जोडी
झुमके : १२० रुपये
कोल्हापुरी गंठण : १५० ते ३००
गौरीचे मुखवटे यासाठी तयार फेटे देखील तयार करून देतो. व्यवसायाच्या निमित्ताने संस्कृती जोपासण्यासाठी आपला हातभार लागतो आहे हे जास्त आनंददायक वाटते.
- विद्या जितेंद्र जोशी, व्यावसायिक
यावर्षी पारंपरिक दागिने म्हणजेच कोल्हापुरी साज विकत घेण्यासाठी जास्त ग्राहक येत आहे. त्याचप्रमाणे मॅट फिनिशिंग असलेल्या गौरीच्या मुखवट्यांची देखील मागणी यावर्षी जास्त आहे.
- गणेश धारुडकर, व्यावसायिक आकुर्डी