...म्हणे जनता कर्फ्यू! भोसरी, इंद्रायणीनगरात जाऊन पाहा 

...म्हणे जनता कर्फ्यू! भोसरी, इंद्रायणीनगरात जाऊन पाहा 

भोसरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. पहिल्याच रविवारी (ता. ६) या जनता कर्फ्यूचा फज्जा उडवत गुरुवारीही (ता. ९) भोसरी, इंद्रायणीनगर परिसरातील सर्वच व्यवहार सुरळीत राहिल्याने जनता कर्फ्यूला जनतेने नाकारल्याचे दिसून आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन शनिवारी (ता. ५) नागरिकांना केले होते. रविवारी (ता. ६) या जनता कर्फ्यूचा फज्जा उडाल्यानंतर गुरुवारी (ता. ९) नागरिक या जनता कर्फ्यूला कसा प्रतिसाद देतात, याची उत्सूकता होती. मात्र, भोसरी आणि इंद्रायणीनगरातील नागरिकांनी या जनता कर्फ्यूला केराची टोपली दाखविल्याने गुरुवारीही भोसरी, इंद्रायमीनगरातील सर्व व्यवहार सुरळीत होते.

भोसरीतील आळंदी रस्त्यावर सम-विषम तारखांना दुकाने सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याने या रस्त्यावरील कै. सखूबाई गवळी उद्यानाच्या बाजूकडील सर्व दुकाने सुरू होती. तर विरूद्ध बाजूंची दुकाने सुरू होती. त्याचप्रमाणे भोसरीतील दिघी रस्ता, संत तुकारामनगर, पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता, चांदणी चौक लांडेवाडी रस्ता आदी भागातील सर्व दुकाने सुरू होती. त्याचप्रमाणे आळंदी रस्ता आणि भोसरी गावठाणातील भाजीमंडईतील व्यवहारही सुरळीत सुरू होते. इंद्रायणीनगरातील मिनी मार्केट, श्री तिरुपती बालाजी चौक, साई चौक आदी भागातील दुकानेही सुरू होती.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोसरीतील पीएमटी चौक आणि इंद्रायणीनगरातील मिनी मार्केट या ठिकाणी रस्त्यावर व पदपथावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाद्वारे गेल्या चार दिवसांपासून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे या कारवाईला घाबरत गुरुवारी या ठिकाणी भाजी विक्रीसाठी बसणे टाळले आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूमध्ये हा एकमेव सकारात्मक प्रतिसाद म्हणावा लागेल. जनता कर्फ्यूमुळे बेकरी चालकांनी विक्रीसाठी येणारे दूध न घेतल्याने नागरिकांना दूध मिळू शकले नाही.  

वाहनांची वर्दळ

महापालिकेने जनता कर्फ्यूचं आवाहन केल्यानंतर नागरिकांनी घरी राहून सहकार्य अपेक्षित होते. मात्र, भोसरी परिसरात नागरिक घराबाहेर आल्याने रस्त्यांवर वाहनांची गर्दी होती. त्याचप्रमाणे खरेदीसाठी आळंदी रस्ता, पीएमटी चौक, दिघी रस्ता आदी भागात आलेल्या ग्राहकांमुळे त्यांच्या वाहनांच्या रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागलेल्या दिसून आल्या. जनता कर्फ्यू जाहीर झाल्यानंतर रस्त्यावर येणाऱ्या वाहनांवर पोलिसांद्वारे निर्बंध लावण्यात येणे गरजेचे असताना अशा वाहनांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने नागरिकांमधून नापसंती व्यक्त करण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिघीत शंभर टक्के बंद

दिघी ग्रामस्थांनी मंगळवारपासून (ता. ७) गुरुवारपर्यंत (ता. ९) सलग तीन दिवस शंभर टक्के बंद पाळण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी (ता. ७) आणि बुधावारी (ता. ८) कडकडीत बंद पाळल्यानंतर आज शेवटच्या दिवशी गुरुवारीही (ता. ९) ग्रामस्थांनी सर्वच व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. त्यामुळे दिघी परिसरात सर्वच ठिकाणी शुकशुकाट होता. या कामगिरीबद्दल दिघी ग्रामस्थांचे परिसरात कौतुक होत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com