कोरोनाचे हाॅटस्पाॅट ठरलंय आनंदनगर

पीतांबर लोहार
शुक्रवार, 22 मे 2020

- एकूण रुग्णसंख्या 36

- दाट लोकवस्तीचा परिणाम

पिंपरी : चिंचवड स्टेशन परिसरातील आनंदनगर झोपडपट्टी. काल परवापर्यंत पुणे-मुंबई महामार्गालगतची एक वस्ती इतकाच परिचय. पण, आता पिंपरी चिंचवड महापालिका व पोलिस प्रशासनासह अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तेही केवळ कोरोनामुळे. कारण, अवघ्या चार-पाच दिवसांत येथील रुग्ण संख्या वाढत आहे. गुरुवारी सायंकाळी सातवाजेपर्यंत येथील रुग्णसंख्या 36 झाली होती. शहरातील रुग्ण वाढीचा हा सर्वाधिक वेग आहे. त्यामुळे आनंदनगर हाॅटस्पाॅट ठरले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मध्यवर्ती ठिकाण

पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे पिंपरी चौक ते चिंचवड स्टेशन परिसर. पुणे-मुंबई महामार्ग व लोहमार्ग यामधील भूभाग. आनंदनगरला लागून शाॅपिंग व फुडमाॅल आहेत. अनेक बॅंकांच्या शाखा आहेत. शहरातील नावाजलेला दवा बाजार आहे. मल्टिस्पेशालिटी रुग्णालये आहेत. रेल्वे मालधक्का व चिंचवड रेल्वे स्टेशन आहे. लोहमार्गाच्या दुसऱ्या बाजूला अनेक गृहनिर्माण सोसायट्या आहेत. आनंदनगरमध्ये सुमारे अडीच हजार झोपडी वजा घरे आहेत. दहा हजारांवर येथील लोकसंख्या आहे. 

आधी दगड खाण, आता...

चिंचवड स्टेशन परिसरात पूर्वी दगड खाणी होत्या. तेथील दगड काढून खडी, चुरा बनवला जायचा. जाते, पाटे, वरवंटे, उखळ अशा वस्तू बनवण्यासाठी येथील दगड उपयुक्त होता. त्यामुळे खाणीतून दगड काढणारे मजूर व दगडी वस्तू बनविणारे कारागीर याच भागात झोपडी उभारून राहू लागले. शिवाय, 1972 चर्या दुष्काळात मराठवाडा व कर्नाटकातून रोजी-रोटीसाठी स्थलांतरित झालेले अनेक जण शहरात आले व मिळेल त्या जागेवर झोपडी उभारून राहू लागले. त्यात आनंदनगरचाही समावेश आहे. शिवाय मध्यवर्ती ठिकाण असल्याने एमआयडीसी जवळ होती. त्यामुळे अनेकांनी आनंदनगला पसंती दिली आणि येथील घरांची संख्या वाढली. मात्र, एका बाजूला महामार्ग, दुसऱ्या बाजूला लोहमार्ग, उत्तरेला चिंचवडगाव जोडणारा रस्ता आणि दक्षिणेला प्रिमियर कंपनी त्यामुळे आनंदनगरच्या विस्ताराला मर्यादा आली. परंतु, गेल्या पन्नास वर्षांत कुटुंबांचा विस्तार झाला. घरी वाढली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कमी क्षेत्रात लोकसंख्येची घनता वाढली. परिणामी दाट लोकवस्ती झाली. कोरोनाचा सामना करण्यासाठी हीच दाटीवाटी आता डोकेदुखी ठरू लागली आहे. सोशल डिस्टंसिंग पाळले जात नाही. घरातच थांबण्याबाबत प्रशासन वारंवार सांगतंय, पण, काही लोक ऐकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.

सोमवारी कहर झाला

आनंदनगर वसाहतीतील 18 जणांना संसर्ग झाल्याचे सोमवारी आढळून आले. एकाच भागात एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडणे, ही शहरातील पहिलीच घटना होती. अवघ्या तीन दिवसांत येथील रुग्ण संख्या 28 झाली होती. येथील एक रुग्ण तर वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित आहे. शनिवार रात्रीपासून हा परिसर प्रशासनाने सील केला आहे. 

लोक रस्त्यावर...

आनंदनगर परिसर सील करण्यात आला. त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडले. आम्हाला सोयीसुविधा दर्या, दुकाने उघडी ठेवा अशी त्यांची मागणी होती. पोलिसांनी आवाहन करून ही कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. घरपोच साहित्य देण्याची व्यवस्था केली. त्यानंतर लोक आपापल्या घरी गेले. मात्र, खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. वस्तीत जाणा-या पाचही वाटा बंद केल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुरुवारी आढळले सहा रुग्ण

चिंचवड स्टेशन आनंदनगर परिसरात गुरुवारी (ता. 21) आणखी सहा रुग्ण आढळले. आणि येथील रुग्ण संख्या 36 झाली. महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात दाखल 14 जणांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले. त्यातील सहा जण आनंदनगरमधील आहेत. अन्य रुग्ण दिघी, पिंपळे सौदगर, पिंपरी, वाल्हेकरवाडी व मुंबई येथील आहेत.

क्वारंटाइनवर भर : आयुक्त

आनंदनगरमधील घराघरातील व्यक्तींची सर्वेलियन पथकामार्फत तपासणी सुरू आहे. संशयित व संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. काहींना होमक्वारंटान तर काहींना संस्थात्मक क्वारंटाइन केले आहे, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anandnagar Becomes Corona Hotspot Area