आंद्रा धरण भरले शंभर टक्के; नदीकाठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा 

रामदास वाडेकर
Sunday, 16 August 2020

तालुक्‍यात ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात शंभर टक्के भरलेले हे पहिले धरण आहे. 

कामशेत (ता. मावळ) : तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्रासह देहू, आळंदी तीर्थक्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आंद्रा धरणातून 335 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. रविवारी (ता. 16) सकाळी सहाच्या सुमारास विसर्ग सुरू झाला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्‍यात ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात शंभर टक्के भरलेले हे पहिले धरण आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शाखा अभियंता अनंता हांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणाचा एकूण साठा 83.30. दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त साठा 82.75 दशलक्ष घनमीटर आहे. धरण शंभर टक्के भरले असून, साडव्यांवरून विसर्ग 335 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. आजपर्यंत आंद्रा धरण परिसरात 635 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मागील वर्षी धरण 27 जुलैपर्यंत शंभर टक्के होते. 

शनिवारी (ता. 15) रात्री आठच्या सुमारास धरण शंभर टक्के भरले आहे. रविवारी सकाळी आठच्या सुमारास विसर्ग सुरू झाला. नदीच्या पाणीपात्रात वाढ झाल्याने नदीकाठावरील गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: andhra dam filled hundred percent water discharged started