पिंपरी महापालिकेत तात्पुरत्या स्वरुपात विधी अधिकारी पदे भरण्यास मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Patil

पिंपरी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये विविध विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.

पिंपरी महापालिकेत तात्पुरत्या स्वरुपात विधी अधिकारी पदे भरण्यास मान्यता

पिंपरी - महापालिकेच्या कायदा विभागात मानधनावर सहा महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात विधी अधिकारी पद भरण्यात येणार आहे, त्यासाठीच्या खर्चास बैठकीत मान्यता दिली. याबरोबरच स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे २१ कोटी ४६ लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये विविध विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. यामध्ये नवीन जिजामाता रुग्णालयात आणि थेरगाव रुग्णालयात सुसज्ज ऑपरेशन थिएटर तयार करण्यात येणार आहे. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन आणि पुनर्वसन विभाग इमारतीच्या दुस-या मजल्यावर लाईट हाउस प्रकल्पाकरीता आवश्यक स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या आकुर्डी गुरुद्वारा चौकापासून ते राजयोग कॉलनी पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करण्यात येणार आहे. यासाठी ७ कोटी १० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दिघी येथील बी.ई.जी. हद्दीमध्ये महापालिकेमार्फत ५० हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांचे २ वर्षांसाठी देखभाल आणि संरक्षण करण्याकामी वनविकास महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे. यासाठी येणाऱ्या १ कोटी ९६ लाख रुपये खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या ‘इ’क्षेत्रीय विद्युत कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रस्तावित मोशी उपअग्निशमन केंद्र येथे अग्निशमन संबंधित विद्युत विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या ७३ लाख रुपये खर्चास तसेच विविध इमारतींमधील फायर अलार्म व फायर फायटिंग यंत्रणेची वार्षिक पद्धतीने देखभाल दुरुस्तीकामी येणाऱ्या ५० लाख रुपये खर्च होणार आहे. महापालिका हद्दीमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन्स उभारण्यात येत आहे. यासाठी आवश्यक मशिनरी आणि विद्युत विषयक कामे करण्यासाठी ९ कोटी ३८ लाख रुपये खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.