
Crime News : पकडायला गेले विनयभंगाचा आरोपी; अन् २७ वर्षांनी हाती लागला खुनातील आरोपी
पिंपरी : पत्नीच्या डोक्यात दगडी उखळ मारून खून केल्यानंतर फरार झालेला आरोपी पती नाव बदलून २७ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर उस्मानाबाद येथे विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना खुनातील आरोपीही हाती लागला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.
रामा पारप्पा कांबळे (वय ६५) असे आरोपीचे नाव आहे. तर सुशीला रामा कांबळे उर्फ लोखंडे असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. १९९५ मध्ये रामा याने त्याच्या पत्नीचा डोक्यात व छातीवर दगडी उखळ मारून खून केला. त्यानंतर तो फरारी होता. त्याच्या मूळगावी कोळनूर पांढरी, ता. लोहारा, जि . उस्मानाबाद येथेही त्याचा थांगपत्ता लागत नव्हता.
दरम्यान, १२ जानेवारी २०२३ ला भोसरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक उस्मानाबादला रवाना झाले. कोळनूर पांढरी या गावातून विनयभंगातील आरोपीला ताब्यात घेतले.
दरम्यान, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी कांबळे हा देखील त्याच गावचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी त्याचाही शोध सुरु केला. तो गावातील घर बंद करून अक्कलकोट तालुक्यातील पालापूर येथे एका महिलेसोबत लग्न करून राहत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिस पालापूर येथे रवाना झाले असता कांबळे हा तेथे नाव बदलून राम कोंडीबा बनसोडे या नावाने राहत असल्याचे समोर आले. तसेच तो शेतमजुरी व वीटभट्टीवर काम करीत असून तो सध्या मावळ तालुक्यातील उर्से येथे शमशुद्दीन पठाण यांच्या वीटभट्टीवर काम करीत असल्याचीही माहिती मिळाली. त्यानुसार दुसरे पथक उर्से येथे रवाना झाले.
आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने स्वतःचे नाव बनसोडे करून आधारकार्ड व बँक खातेही उघडले. २७ वर्षे नाव बदलून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर गजाआड झाला.