खाकीमुळे वाचले चौघा मायलेकरांचे प्राण; महामार्गावर थांबून करणार होते आत्महत्या

खाकीमुळे वाचले चौघा मायलेकरांचे प्राण; महामार्गावर थांबून करणार होते आत्महत्या

कामशेत (ता. मावळ) : ठिकाण शिक्रापूर चौक, पेट्रोल पंपाजवळ. वार शुक्रवार (ता. ५). वेळ रात्री एकची. बारा वर्षांचा मुलगा, तीन मोठ्या बहिणी अन् त्यांची आई महामार्गाच्या कडेला उभी होती. त्यावेळी सगळे गाढ झोपेत असताना, ही माऊली आपल्या मुलांसह मध्यरात्री किती वेळ उभी असेल, तिच्या मनात विचारांचे काय काहूर असेल, लहानग्या लेकराचा हातात हात घेऊन त्याच्या भविष्याच्या चिंतेत असेल का? की तिला कुठे जायचे असेल, अशा एक ना अनेक प्रश्न रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना पडला असेल; पण त्यांची साधी कोणी चौकशीही केली नाही. कित्येक नजरा त्यांच्याकडे पाहून पुढे गेल्या, मात्र संवेदना हरवलेल्या समाजाला ती अबला जाणवली नाही. अखेर ही महिला दिसली, तिच्या चेहऱ्यावरचा ताण अन् दुःख दिसलं ते एका खाकी वर्दीतील भल्या माणसाला अर्थात सहायक पोलिस उपनिरीक्षकाला. असं काय झालं, की ही महिला आपल्या लेकरांना घेऊन मध्यरात्री महामार्गाच्या कडेला उभी होती. 

पल्लवी बाळासाहेब पवार (रा. सावेडी, जि. नगर) या घरातील कलहामुळे शिक्रापूरच्या मांढरेवस्तीत राहणाऱ्या प्रीती जाधव या बहिणीच्या मुलीकडे दोन दिवसांपूर्वी आल्या होत्या. त्यांच्यासोबत सहावीत शिकणारा नैतिक, महाविद्यालयात शिकणाऱ्या वैष्णवी, वैभवी व सोनल या मुली होत्या. प्रत्येकाच्या घरी काही ना काही कारणांवरून कौटुंबिक कलह असतो; पण पल्लवी यांनी मध्यरात्री महामार्गावर येऊन घेतलेला निर्णय हा धक्कादायक होता. ‘मी माझ्या मुलांसोबत जीवन संपवत आहे’, असे स्टेट्स त्यांनी मोबाईलवर ठेवले होते. त्या महामार्गापासून काही अंतरावरून वाहणाऱ्या भीमेच्या पात्रात मुलांसमवेत आत्महत्या करणार होत्या, असे चौकशीसाठी थांबलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्रापूर, शिरूर, रांजणगाव, लोणीकंद परिसरात रात्री एटीएम फोडण्याचे प्रकार घडत आहेत. या चोऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पाटील आपल्या कार्यालयांतून वाहनचालक अक्षय नवले आणि हवालदार चंद्रकांत झेंडे यांना घेऊन अकरा वाजता वाघोली, लोणीकंद मार्गे शिक्रापूर चौकात पोहोचले. जवळच्या पेट्रोलपंपावर गाडीत डिझेल टाकून तेही पुढे निघाले, त्यांनीही या मायलेकरांना पाहिले. ते पुढे गेले; पण एवढ्या रात्री ही महिला येथे काय करते या चौकशीसाठी ते पुन्हा माघारी फिरून आले. पोलिसांच्या चौकशीत वस्तुस्थिती पुढे आली. 

...अन् चौघांना घरी सोडले 
सहायक उपनिरीक्षक विजय पाटील यांनी पल्लवी व त्यांच्या मुलांना प्रीती जाधव यांच्या घरी सोडले. जाधव यांच्या फोनवरून त्यांच्या नातेवाइकांना माहिती दिली. रात्री दोन वाजता या चौघा मायलेकरांना नातेवाइकांकडे सोपवून पाटील आणि टीम पुढे गस्तीसाठी रवाना झाले. दोन दिवसांच्या समुपदेशन व विसाव्यानंतर जाधव यांची आई आणि मावशी त्यांना सोबत घेऊन गेल्या. जाधव म्हणाल्या, स्टेट्स पाहून आम्ही काळजीत होतो. मावशी आणि भावंडं रात्री दोन वाजता घरी आल्यावर जीवात जीव आला.’’ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पल्लवी यांच्याशी बोलताना, त्यांनी दिलेली उत्तरे आणि बोलण्याचा रोख कळला. विश्‍वासात घेऊन बोलल्यावर खरे कारण समजले. 
- विजय पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक 
 

(संपादन- शिवनंदन बाविस्कर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com