पिंपरी-चिंचवडमधील 'या' भाजप आमदाराने केला प्लाझ्मा दान; आता कुटुंबीयही करणार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

  • १३० जणांची नोंदणी, पिंपरी-चिंचवडकरांचा महाराष्ट्रासमोर आदर्श
  • पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन

भोसरी : पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी स्वत: प्लाझ्मा दान करीत आदर्श निर्माण केला. तसेच, कोरोनावर मात करून बरे झालेल्या नागरिकांनी प्लाझ्मा दान करून एक जीव वाचवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. 15) महेश लांडगे यांनी ‘प्लाझ्मा दान’ शिबिराचे आयोजन केले. वल्लभनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तपेढीत हे प्लाझ्मा दान शिबिर आयोजित केले होते. त्यासाठी १३० जणांनी नोंदणीही केली होती. लांडगे म्हणाले, "महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांना विनंती केली होती, की प्रत्येक कोविड सेंटरमध्ये प्लाझ्मा डोनेशन कॅम्प सुरू करावे. जास्तीत जास्त कोविड रुग्णांना मदत करण्यासाठी विविध राज्य व रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा डोनेशन मोहीम सुरू केली आहे. प्लाझ्मा दातांच्या कमतरतेमुळे ही थेरपी महाग आहे. त्यामुळे शहरात प्लाझ्मा डोनेशन कॅम्प सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रभागनिहाय नियोजित कोविड केअर सेंटरमध्ये आपण स्वतंत्र ‘विंडो’ सुरू करावी. तसेच, प्लाझ्मा डोनेशनसाठी रुग्णांमध्ये जनजागृती करावी.  15 ऑगस्टच्या  निमित्ताने स्वत: प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करून या मोहिमेची सुरुवात केली. "

कोण करू शकतो प्लाझ्मा दान?

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये 21 दिवसांनंतर अँटीबॉडीज तयार होतात. अँटीबॉडीमुळे कोरोनाग्रस्तांची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते. म्हणून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्रामुख्याने या शिबिरासाठी बोलवण्यात आलं होत. अशा प्रकारे प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात मदतच मिऴणार आहे.

लांडगे कुटुंबीयही करणार प्लाझ्मा दान

महेश लांडगे यांनी स्वत: देखील प्लाझ्मा दान केला आहे. एवढंच नाही, तर लांडगे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयातील इतर सदस्य प्लाझ्मा दान करण्यासाठी शिबिरामध्ये सहभागी झाले होते. शिबिरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे काही नियम व अटी सरकारने लागू केलेले ते सर्व नियम पाळण्यात येत आहेत.

पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन

पिंपरी-चिंचवडकरांनी कोरोनापासून स्वत:च रक्षण करण्यासाठी सर्व नियमांचं पालन करावं. तसेच, कोणाच्या घरी जर कोरोनाचा रुग्ण आढळल्यास घाबरू नका. काही अडचण आल्यास मी आणि माझे कार्यकर्ते कायम मदतीसाठी तयार आहोत, असेही लांडगे यांनी आश्वासन दिलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhosari BJP MLA Mahesh Landage donated plasma