महावितरणमुळे 'या' दोन कुटुंबांच्या आयुष्यात काळोख! 

अविनाश म्हाकवेकर 
Thursday, 17 September 2020

दहा दिवसांपूर्वीच्या ट्रान्सफॉर्मर स्फोटात त्यांनी पत्नी शारदा, मुलगी हर्षदा आणि चार महिन्यांची नात शरण्या गमावली आहे.

पिंपरी : "माझी बायको हातापाया पडून महावितरणचा इंजिनिअर सुनील रोटे याला सांगत होती. अरे बाबा, उद्या या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होईल. हे सतत होतंय. हे आमच्या जिवावर येईल...आणि काय सांगू साहेब, तिची वाचा खरी ठरली! ती बोलली तसंच झालं हो...'' रडत-रडत साठ वर्षीय दिलीप कोतवाल सांगत होते. 

दहा दिवसांपूर्वीच्या ट्रान्सफॉर्मर स्फोटात त्यांनी पत्नी शारदा, मुलगी हर्षदा आणि चार महिन्यांची नात शरण्या गमावली आहे. आता सोबत उरलीय मानसिक रुग्ण असलेल्या पंचवीस वर्षीय मुलाची. मुलीचा पती सचिन काकडे याचीही अशीच स्थिती झाली आहे. आधार कोणी कोणाला द्यायचा? घराघरांत प्रकाश पुरविणाऱ्या महावितरण कंपनीने या दोन कुटुंबांच्या आयुष्यात कायमचा अंधार करून टाकला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भोसरी इंद्रायणीनगरातील राजवाडा क्रमांक तीन या इमारतीत कोतवाल राहतात. पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी असा छोटा परिवार. वीस वर्षांपूर्वी मुलाचे मानसिक संतुलन बिघडलेले. त्यामुळे त्याला सांभाळता सांभाळता साऱ्यांची दमछाक. मुलगी बीकॉम झाली. पाच वर्षापूर्वी विवाह झाला. मात्र, तिलाही मूल होत नव्हतं. त्यामुळे पुन्हा सर्वजण काळजीत. मात्र, चार महिन्यांपूर्वी त्यांच्या आयुष्यात आनंद पसरला. कारण नात झाली. स्पाइन रस्ता परिसरात राहणारी मुलगी बाळाला अंघोळीसाठी म्हणून तीन-चार दिवसांतून आईकडे यायची. घराच्या आवारातील ओट्यावर साडेबारा वाजता न्हाऊ घालायची. सर्व कुटुंब आणि आजूबाजूच्या बायकाही येथेच गप्पा मारत बसायच्या. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रविवार, सहा सप्टेंबरला मात्र, साडेबाराऐवजी सव्वाला अंघोळ घालायला सुरुवात झाली आणि त्याचवेळी लगतच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. उकळत्या तेलाचा फवारा तीस फूट उंच उडून थेट बाळासह आई आणि आजीच्या अंगावर पडला. एका क्षणात सर्वजण होरपळले. किंकाळ्या, आरडाओरड्याने परिसर भेदरला. रुग्णालयात दाखल केले; पण सारे काही उपचारापलिकडे गेले होते. त्याच सायंकाळी साडेसहाला आजीचा मृत्यू झाला. रात्री साडेआठला इवल्याशा जिवाचा श्‍वास थांबला. दोन दिवसांनी बाळाची आईने प्राण सोडला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या घटनेला दहा दिवस झाले आहेत. घराला कुलूप आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंतची भिंत ऑइलने काळी पडली आहे. ओट्यालगतची झाडे करपली आहेत. तारेवर अडकवलेली बाळाची दुपटी अजूनही तशीच आहेत. रबरी स्लिपर, आंघोळीचा प्लास्टिक टब, पाण्याचे पिंप वितळून गेला आहे. ट्रान्सफॉर्मरचा रिकामा चौथरा ऑइलने माखलेला आहे. हे सारे पाहूनच घटनेची भयानकता लक्षात येते. घटना इतकी ताजी असूनही महावितरणविरोधात कोणी आंदोलन केले नाही, की आजोबांच्या बाजूने कोणी उभारले, ही शोकांतिका आहे. 

'घरात जायची भीती वाटते' 

शरीरातून त्राण गेलेले आजोबा, आता चऱ्होलीतील कोतवालवाडीत नातलगांकडे राहायला गेले आहेत. ते म्हणतात, ""आता त्या घरात जायची मला भीती वाटते. घास घशाखाली जात नाही आणि डोळ्याला डोळा लागत नाही. अजूनही मला बायको, मुलगी आणि नात दिसते'' ते बोलत राहतात आणि ऐकणाऱ्या डोळ्याला धारा लागतात. त्यांचा मुलगा उंबऱ्यावर येऊन ऐकत उभा राहतो. बापाची काळीज फोडणारी कहाणी ऐकताना तोही सुन्न झालेला असतो. 

संकटाच्या वावटळात 'त्यांची' नौका फुटली 

आजोबांचे जावई सचिन काकडे वडगाव शिंदे गावचे. काही वर्षांपूर्वी ते व्यवसायानिमित्त भोसरीत आले. स्पाइन रोडवर ते भाड्याने राहतात. त्यांची सोडा विक्रीची टपरी आहे. लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद झाला. आर्थिक ओढाताणीचे संकट ओढवले असतानाच 14 एप्रिलला वडिलांचे निधन झाले. त्याच दिवशी कन्येच्या जन्माचा आनंद. अशी सारी विचित्र परिस्थिती. त्यामुळे काकडे मूळ गावी परतले. वातावरणात बदल व्हावा म्हणून आठ दिवसांपूर्वी त्यांनी पत्नीला बाळासह सासरी सोडले आणि ही घटना घडली. संकटाच्या वावटळात त्यांची नौका फुटली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhosari transformer blast case review news