मृतांच्या वारसांची मदतीअभावी फरपट; भोसरी ट्रान्सफॉर्मर स्फोट प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

  • ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ

पिंपरी : भोसरी ट्रान्सफॉर्मर स्फोटातील तीन मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत तत्काळ दिली, अशी घोषणा ‘महावितरण’ने केली. मात्र, तीन आठवडे उलटूनही मदत दूरच राहिली, एकही अधिकारी सांत्वनासाठीदेखील आलेला नाही आणि कोणी फोनही घेत नाहीत, अशी व्याकूळ स्थिती ज्येष्ठ नागरिक दिलीप कोतवाल आणि त्यांचे जावई सचिन काकडे यांची झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भोसरीतील इंद्रायणीनगरातील राजवाडा क्रमांक तीन या इमारती लगतच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट सहा सप्टेंबरला झाला होता. यात एकाच कुटुंबातील शारदा दिलीप कोतवाल (वय ५६), हर्षदा सचिन काकडे (२८) व शरण्या सचिन काकडे (चार महिने) यांचा करुण अंत झाला होता. यात चूक या निष्पाप जिवांची नाही, मग कोणाची? सदोष ट्रान्सफॉर्मरची की तो बसविताना हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्याची? याचा शोध अहवाल महावितरण तयार करीत आहे. याला अजून किती महिने लागतील, याची स्पष्ट होत नाही. ज्याच्या मार्गदर्शनाखाली ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू होते, तो कनिष्ठ अभियंता सुनील रोटे त्या दिवसापासून पसार आहे आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सारेच गौडबंगाल. मदत जाहीर केली; पण अंमलबजावणी नाही आणि अधिकारी निलंबित केले असे सांगितले. मात्र, त्यांची नावे सांगितली जात नाहीत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोतवाल यांनी अद्याप त्या फ्लॅटमध्ये पाय ठेवलेला नाही. घटना घडलेल्या दिवसांपासून चऱ्होलीतील कोतवालवाडीत एका नातेवाइकांकडे राहायला गेले आहेत. सोबत मानसिक स्वास्थ नसलेल्या तरुण मुलगा आहे. उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने आश्रीतसारखे त्यांचे जगणे झाले आहे. वडगाव शिंदे येथे राहणारे जावई सचिन काकडे यांची आर्थिक परिस्थिती लॉकडाउनमुळे कोलमडून गेली आहे. त्यातच पत्नीचा आणि बाळाचाही मृत्यू झाल्याने ते कोलमडून गेले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घटनेच्या दुसऱ्या दिवशी महावितरणकडून प्रत्येकी चार लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केली. मात्र, ती रक्कम मिळालेली नाही. तसेच महावितरणचा अधिकारी सांत्वनासाठी घरी गेलेला नाही, या बाबत जावई व सासरे दोघे मिळून महावितरणशी सतत संपर्क करत आहेत. मात्र, कोणी दाद देत नाही. पाठपुरावा करणाऱ्या ‘सकाळ’ प्रतिनिधीलाही याचा अनुभव आला.

माहिती देण्यास टाळाटाळ

भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सुनील कल्याण रोटे (वय ३०, रा. स्पाइन रस्ता) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याचा तपास उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार यांच्याकडे आहे. मात्र, पुढील तपासाविषयी त्यांच्याकडून ठोस माहिती देण्यास टाळाटाळ केली गेली. रोटे हे १७ सप्टेंबरला ठाण्यात हजर आले आणि लगेच त्यांना अटक दाखवून जामीन मंजूर झाला, असे समजते.

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

या घटनेविषयी कोणीही अधिकारी बोलायला तयार नाही. जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत  म्हणाले, की माहिती घेऊन सांगतो. पुणे गणेशखिंड मंडळाचे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यांनीही राऊत माहिती देतील, मी त्यांना सूचना देतो, असे सांगितले. मात्र, तशा सूचना त्यांनी दिल्या नाहीत. सतत संपर्क साधूनही तगलपल्लेवार यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. अखेरीस ‘‘शोध तपासणी समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. पोस्टमाॅर्टेम रिपोर्ट उशिरा आला. कागदपत्रांची सोमवारपर्यंत पूर्तता करून धनादेश दिले जातील,’’ एवढेच सांगितले. मात्र, दोघांनीही लेखी माहिती दिली नाही.

घटना कशामुळे, अहवाल कधी?

घटनेची तपासणी इलेक्‍ट्रिकल निरीक्षक थोरात करत आहेत. घटना कशामुळे घडली, अधिकारी दोषी की ट्रान्सफॉर्मर सदोष, याचा अहवाल देण्याची त्यांची जबाबदारी आहे. त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र, कॉल स्वीकारले नाहीत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhosari transformer explosion case followup story