Wet Garbage
Wet Garbageesakal

Wet Garbage : ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती

‘ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती’ प्रकल्प उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे

Wet Garbage : कचऱ्यामुळे शहराचा ‘कचरा’ होऊ नये, यासाठी महापालिका विविध उपाययोजना करत आहे. वीज, खत, कोकोपीट, बायोडिझेल निर्मिती केली जात आहे. भंगार प्लॅस्टिक व राडारोड्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर केला जात आहे. तरीही सद्यःस्थितीत किरकोळ वाटणाऱ्या ओल्या कचऱ्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होऊ शकतो. त्यावर उपाययोजना करण्यासाठी ‘ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती’ प्रकल्प उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
घरे, दुकाने, हॉटेल्स, कार्यालये, मंडई, बाजारपेठा आदी ठिकाणी निर्माण होणारा कचरा सध्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये नेला जातो. जैववैद्यकीय कचऱ्याची वायसीएम रुग्णालयाच्या आवारातील प्रकल्पात विल्हेवाट लावली जाते. घरोघरच्या कचऱ्याचे जागेवरच ओला, सुका, प्लॅस्टिक, काच अशा पद्धतीने वर्गीकरण केले जाते. घंडागाडीतून तो कचरा संकलन केंद्रात नेऊन तेथून कचरा डेपोत नेला जातो. त्याचे क्षेत्र सुमारे ८१ एकर आहे. दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे डेपोची क्षमता संपत आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या उपाययोजना महापालिका करत आहे.

प्रायोगिक तत्त्वावर सुरू
शहरातून प्रतिदिन गोळा होणाऱ्या सुमारे ५० टन हॉटेल वेस्टवर (ओला कचरा) प्रक्रिया करण्यासाठी बायो सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचे काम स्वच्छ भारत अभियानांतर्गत चालू केले आहे. पूर्ण क्षमतेने तो लवकरच कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.

कचरा डेपोवरील ताण कमी करण्यासाठी
- घनकचरा व्यवस्थापनासाठी लोकसहभाग वाढवून ओला व सुका वर्गीकरण करणे
- गृहनिर्माण सोसायट्यांनी स्वतःचा कचरा स्वतःच जिरवण्यासाठी प्रकल्प उभारणे
- प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती
- सुक्या कचऱ्यापासून वीज निर्मिती
- ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती
- ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती
- बांधकामाच्या राडारोड्यावर प्रक्रिया करून कॉंक्रिट वीट, पेव्हर ब्लॉक, ट्री-गार्ड निर्मिती
- शहाळे व सुक्या नारळाच्या काथ्यापासून कोकोपीट निर्मिती
- शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, बायोमायनिंक करणे

दृष्टिक्षेपात कचरा (सरासरी)
तपशील / प्रतिवर्षी (मेट्रिक टन) / प्रतिदिन (मेट्रिक टन)
२०१९-२० / ३,७९,३४८ / १,०३९
२०२०-२१ / ३,६३,५२७ / ९९६
२०२१-२२ / ४,११,९८० / १,१२८
२०२२-२३ / ४,२६,३५४ / १,१६८

‘‘शहरात ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरणाचे प्रमाण वाढले आहे. सुक्‍या कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जात आहे. सध्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीही सुरू आहे. हे खत महापालिकेच्या सर्व उद्याने व महापालिकेने लावलेल्या झाडांना दिले जात आहे. काही शेतकरीही खत घेऊन जात आहेत. तरीही काही खत शिल्लक राहत आहे. भविष्यात शहराची व लोकसंख्येची वाढ लक्षात घेता, आणखी ओला कचरा निर्माण होऊन गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. त्याच्या निर्मूलनासाठी आतापासून पावले उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीबरोबरच बायोगॅस निर्मिती प्रकल्पाचीही गरज आहे.’’
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com