विरोधकांच्या आंदोलनाची हवा काढून टाकण्यासाठी भाजपने खेळला मास्टर स्ट्रोक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 February 2021

गुरुवारची तहकूब सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी दोन वाजता सुरू झाली. भाजपचे नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ व शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पदाधिकारी आंदोलन करण्याच्या तयारीसाठी विरोधी पक्ष नेत्यांच्या कक्षात होते.

पिंपरी : महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. 18) होती. स्थायी समितीवर अपक्ष आघाडीतून सदस्य नियुक्त करायच्या प्रक्रियेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांनी आक्षेप घेतल्याने गोंधळ झाला. त्यातच नियुक्तीस मंजुरी देऊन महापौरांनी सभा सोमवारपर्यंत तहकूब केली होती. आजच्या सभेत आंदोलन करण्याचा पावित्रा विरोधकांनी घेतला होता. मात्र, ते सभागृहात येण्यापूर्वीच सभा तहकूब करून भाजपने विरोधकांच्या आंदोलनाची हवाच काढून टाकली.

गुरुवारची तहकूब सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी दोन वाजता सुरू झाली. भाजपचे नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ व शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पदाधिकारी आंदोलन करण्याच्या तयारीसाठी विरोधी पक्ष नेत्यांच्या कक्षात होते. 'भाजप हटाव, महापालिका बचाव'असे अॅप्रन घालून ते महापालिका सभागृहाकडे निघाले. ते सभागृहात  पोहोचण्यापूर्वीच  महापौरांनी सभा तहकूब झाल्याचे जाहीर केले आणि राष्ट्रगीत सुरू झाले. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेचा आंदोलनाचा डाव फसला.

''महापालिका स्थायी समिती विशेष सभा अडीच वाजता होती. त्यामुळे नऊ मार्चपर्यंत सर्वसाधारण सभा तहकूब केली. ''
- नामदेव ढाके, सभागृह नेते, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP and opposition in Pimpri-Chinchwad Municipal Corporation