पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर पदासाठी भाजपचा उमेदवार ठरला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

महापालिकेतील सत्ताधारी भाजपने उपमहापौर पदासाठी केशव घोळवे यांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले आहे.

पिंपरी : महापालिकेतील सत्ताधारी भाजपने उपमहापौर पदासाठी केशव घोळवे यांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले आहे, असे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने 'सकाळ'ला सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणाला रिंगणात उतरवते, की उमेदवार न देता निवडणूक बिनविरोध होते, हे आज सायंकाळी पाचनंतर स्पष्ट होणार आहे. कारण उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (ता. 6) सकाळी अकरा वाजता होणार असली, तरी या पदासाठी सोमवारी (ता. 2) दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे. मात्र, पक्षाचे माजी शहराध्यक्ष चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, विद्यमान शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे, निष्ठावंत कार्यकर्ते आणि पक्षात राहूनही अनेकदा विरोधी भूमिका घेणारे पदाधिकारी, अशा चार गटात पक्ष विभागला गेला आहे. त्यामुळे कोणत्या गटाला उपमहापौरपद मिळते, याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघात समावेश होणाऱ्या प्रभागांचे नेतृत्व करणारे केशव घोळवे आणि वसंत बोराटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, पक्षाच्या बैठकीत घोळवे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झाल्याचे एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

ऐनवेळी बदलाची आजही चर्चा 

पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार, तुषार हिंगे यांनी 14 ऑक्‍टोबर रोजी उमहापौरपदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त जागेसाठी आज अर्ज भरण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी 22 नोव्हेंबर रोजी हिंगे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांच्या विरोधात उतरलेले राष्ट्रवादीचे उमेदवार राजू बनसोडे यांनी ऐनवेळी माघार घेतली होती. वास्तविकतः त्यावेळी भाजपने शीतल शिंदे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या ऐनवेळी ते अनुपस्थित राहिल्याने हिंगे यांना उपमहापौरपदाची लॉटरी लागली होती. आताही अशाच नाट्यमय घडामोडी घडणार का? अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. 

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीनंतर भाजपने अनुक्रमे शैलजा मोरे, सचिन चिंचवडे, तुषार हिंगे यांना उपमहापौरपदाची संधी दिली आहे. मोरे, हिंगे व शिंदे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रभागाचे आणि चिंचवडे हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभागाचे नेतृत्व करीत आहेत. आता भोसरी मतदारसंघातील नगरसेवकांच्या नावांची चर्चा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राष्ट्रवादी कॉंग्रेसही आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याची चाचपणी करीत आहेत. संख्याबळानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 34 नगरसेवकांचे बळ आहे. त्यांच्या दोन नगरसेवकांचे निधन झाल्याने संख्याबळ दोनने कमी झाले आहे. शिवसेनेच्या नऊ व मनसेच्या एक अशा दहा नगरसेवकांची ताकद आपल्याला मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. शिवाय, भाजपमध्ये बंडाळी झाल्यास त्याचा फायदा आपल्याला होईल का? असाही त्यांचा कयास आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपचे 76 नगरसेवक आहे. त्यांच्याही एका नगरसेवकाचा मृत्यू झालेला असल्याने संख्याबळ एकने कमी झाले आहे. पाच अपक्ष नगरसेवकांपैकी भाजपचे समर्थक चार नगरसेवक आहेत. म्हणजेच भाजपचे संख्याबळ 128 सदस्यांच्या सभागृहात 80 आहे. राष्ट्रवादीकडे शिवसेना, मनसे व एक अपक्ष मिळून 45 संख्याबळ होईल. गेल्या वर्षी महापौर, उपमहापौर निवडणुकीतही संख्याबळानुसार महापौरपदी भाजपच्या उषा ढोरे विराजमान झाल्या होत्या. राष्ट्रवादीच्या स्वाती काटे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर उपमहापौरपदाच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने माघार घेतली होती. त्यामुळे भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आला होता. आता राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार, हे सायंकाळी पाचनंतरच स्पष्ट होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP has decided to field Keshav Gholave for the post of Deputy Mayor of Pimpri Chinchwad