मोशी परिसरातील 'या' नाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

मोशी परिसरातील 'या' नाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

मोशी (पिंपरी-चिंचवड) : कचरा डेपोमधून सुरू होणारा व मोशी परिसरातून वाहत येणार्‍या नाल्यात काळ्या रंगाचे दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

गेल्या चार महिन्यांपासून मोशीकर कोरोनाशी दोन हात करत आहेत. त्यातच मागील आठवड्यात पोटदुखी व अतिसार या आजाराने येथील नागरिकांनी दवाखान्याचा रस्ता धरला होता. या आजाराला प्रत्येक घरात तोंड दिले जात आहे. या परिस्थितीतून हळूहळू सुधारणा होत नाही, तोच कचरा डेपोमधून वाहत येणार्‍या नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना आरोग्य धोक्यात आले आहे. घाणेरड्या पाण्यामुळे डास व माशांच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सुमारे वीस वर्षांपूवी मोशी गावचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये झाला. त्यावेळी मोशी गायरान असलेल्या काही भागावर महापालिकेने कचरा डेपो सुरू केला. सध्या या कचरा डेपोमध्ये दररोज शेकडो मॅट्रिक टन कचरा टाकला जातो. त्यामुळे येथे कचऱ्याचे डोंगराच्या डोंगर तयार झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर साचलेल्या या कचर्‍यातून काळ्या रंगाचे दुर्गंधीयुक्त पाणी कचरा डेपो परिसरातील नाल्यात व जवळच असलेल्या निसर्गनिर्मित तळ्यात मिसळले जाते. येथील हे तळे व नाले पूर्वीपासूनच आहेत, असे स्थानिक ज्येष्ठ नागरिक सांगतात व प्रत्यक्षात पाहणी केले असता ते असल्याचे निदर्शनास येत आहे. 

या निसर्गनिर्मित तळ्याला बाराही महिने पाणी असते. तसेच, याच तळ्याच्या परिसरातून नाला वाहतो, तो कचरा ते इंद्रायणी नदी असा उत्तर-दक्षिण वाहतो. हा नाला कचरा डेपोमधून सुरू होऊन वाघजाई वस्ती, बोराटे वस्ती, हजारे वस्ती, पूर्व बनकरवाडी, दक्षिण लक्ष्मीनगर, आल्हाटवाडी, सस्तेवाडी पुढे देहू-आळंदी बीआरटीएस रस्त्याच्या खालून हा नाला इंद्रायणी नदीला जाऊन मिळतो. पिंपरी-चिंचवड शहरातून येणारा हॉटेल वेस्ट, मंडई व मटण मार्केट, शॉपमधील ओला कचरा, विविध कचरा कुंड्यांमध्ये साचणारा सुका कचरा, राडारोडा आदी मोठ्या प्रमाणावरील कचरा या तळ्यालगतच्या कचरा डेपोवर टाकला जातो. या कचर्‍याची दुर्गंधी येऊ नये म्हणून यावर विविध प्रक्रिया करून रसायने फवारून, हवारी करून त्यांचे विलगीकरण करण्यात येते. मात्र, तरीही या साचलेल्या कचऱ्यातील काळे दुर्गंधीयुक्त पाणी या तळ्यासह परिसरातील नाल्यांमध्ये साचते व ते या नाल्याच्या माध्यमातून इंद्रायणी नदीत जात असल्याचे काही स्थानिक नागरिकांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या नाल्याच्या दोन्ही बाजूला आजही काही प्रमाणात शेती केली जाते; तर अनेक चाळी, घरे, गगनचुंबी इमारतींमधील सदनिकांमध्ये शेकडो नागरिक राहत आहेत. त्यामुळेच या नाल्यांमधून वाहणार्‍या पाण्याला येणारा घाणेरडा वास व त्यामधूनच सायंकाळी मोठ्या प्रमाणावर डासांची व माशांची उत्पत्ती होत असते. या घाणेरड्या पाण्याचा परिसरातील शेतीच्या पिकांसह विहिरीतील पाण्यावरही परिणाम होत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे यापूर्वीच नागरिकांनी कळवले आहे. या बाबत महापालिकेच्या सारथीला पंधरा दिवसांपूर्वी तक्रारही नोंदवली असून, महापालिकेचे पर्यावरण अधिकारी व कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनाही ही समस्या सोडविण्यासाठी सांगण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष हजारे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने या तळ्यासह कचरा डेपोमधून निर्माण होणाऱ्या या नाल्याची स्वच्छता करावी, त्याच्या पाण्याचे परीक्षण करावे, नालेसफाई, निर्जंतुकीकरण करून नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी संबंधितांनी  कार्यवाही करावी, अशी मागणी सविता बोराटे, स्वाती गोळे, प्रियांका बसुदे, दीप्ती अगिवाल, संतोष बोराटे, सचिन गोळे, प्रमोद कंक, राहूल फटांगरे, हितेश गायकवाड, ललित पाटील, सौरव अगिवाल, मनोज ताठे, बाजीराव हजारे, आनंद हजारे आदी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

...तर त्याची चौकशी व्हावी

काही दिवसांपूर्वी या कचरा डेपोमध्ये कचर्‍याच्या गाडीमधून एक कुजलेले प्रेत आले होते. त्यामुळे मोशी उपनगरासह संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. 
याप्रमाणेच आणखीही काही आरोग्यास अपायकारक असणारा कचरा या डेपोत येत असेल, तर त्याचीही चौकशी व्हावी व येथील निसर्गनिर्मित या तळ्याची स्वच्छता करण्याचीही मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

या कचर्‍यातून निघणारे काळ्या पाण्याचे प्रमाण जास्त आहे. ते नाल्यामध्ये जाऊ नये म्हणून येथे पंप लावण्यात आले आहेत. मात्र, ते योग्य क्षमतेचे नसल्याने येथील पाणी या नाल्यात मिसळले जाते. येत्या पंधरा दिवसांत यावर उपाययोजना करण्यात येईल. 
- संजय कुलकर्णी, पर्यावरण अधिकारी व कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका 

Edited by : Shivnandan Baviskar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com