
सृष्टी चौक परिसरात पुन्हा काही श्वान मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान, रविवारी दगावलेल्या श्वानांचे शवविच्छेदन झाले असून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
पिंपरी, जुनी सांगवी - चार दिवसांपूर्वी पिंपळे गुरव परिसरात दोन श्वानांचे (dog) मृतदेह आढळल्याची घटना ताजी असताना याच परिसरात मागील दोन दिवसांत पुन्हा दहा श्वानांचे मृतदेह आढळले आहेत. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे खळबळ उडाली असून, प्राणीप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
चार दिवसांपूर्वी पिंपळे गुरव परिसरात एका श्वानाच्या तोंडातून फेस येऊन मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यावेळी आजूबाजूला पाहणी केली असता आणखी एका श्वानाला पोत्यात टाकून जाळल्याचे समोर आले. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. 5) सकाळी साडेआठच्या सुमारास सृष्टी चौक परिसरात पुन्हा काही श्वान मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान, रविवारी दगावलेल्या श्वानांचे शवविच्छेदन झाले असून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पंधरा दिवसांपूर्वी काळेवाडीत इमारतीच्या सातव्या मजल्यावरून श्वानाला खाली फेकल्याची घटना घडली. दरम्यान, जीवे मारण्याच्या हेतूने श्वानांना खाद्यपदार्थांमधून विषबाधा केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शहरात अज्ञातांकडून भटक्या श्वानांचा छळ केला जात आहे. त्यांना खाद्यपदार्थांतून विषबाधा केली जात असल्याने श्वान दगावण्याचे प्रकार घडत आहेत.
दहा ते बारा श्वानांसह पिलांचा विषबाधेमुळे संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी श्वानप्रेमी कुणाल यांनी पोलिसात धाव घेतली आहे. गंभीर बाब म्हणजे मादीच्या सहा पिल्लांचा देखील मृत्यू झाल्याचा संशय प्राणिप्रेमींना आहे. हे कुकर्म करणाऱ्यांचा पोलिस प्रशासन तपास करीत आहेत. याचा तपास होऊन दोषींना कठोर शिक्षा होण्याची मागणी प्राणी प्रेमींकडून केली जात आहे.
पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
""मन हेलावून टाकणारी गोष्ट आहे. या प्रकरणाची माहिती घेतली जात आहे. विकृतीच्या मागे असलेल्या व्यक्तींचा कसून तपास सुरू आहे.''
- अजय भोसले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सांगवी पोलिस ठाणे
""मुक्या प्राण्यांच्या या कारस्थानामागील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. सांगवी पोलिसही याचा तपास करीत आहेत.''
- कुणाल कामत, स्ट्रेडॉग्ज फीडर ग्रुप, सांगवी