'मित्र आणि वायसीएमच ठरले देवदूत'; कोरोनातून बरे झालेल्या उद्योजकाने भावना केली व्यक्त

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

अन्नाची चव कळत नव्हती. काही खावेसेच वाटत नव्हते. दोन दिवस असेच गेले. याबाबत मित्र कुंडलिक आमले आणि अजय रोकडे यांना सांगितली. अँटिजेन टेस्ट केली. रिपोर्ट पॉझिटीव्ह. पुढे काय? असा प्रश्‍न निर्माण झाला.

पिंपरी : ''कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने थोडा खचलो. वीस लाखांची मेडिक्‍लेम पॉलिसी होती. खासगी मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ, असे वाटले. पण, मित्राने 'वायसीएम'चे नाव सांगितले आणि भीती आणखी वाढली. कारण, महापालिकचे हॉस्पिटल? कसे उपचार होणार? मनात अनेक शंका आल्या, पण मित्रावर विश्‍वास ठेवला. वायसीएमला गाठले आणि तिसऱ्याच दिवशी बरे वाटू लागले. आता ठणठणीत बरा झालोय. माझ्यासाठी वायसीएम आणि आधार देणारे मित्रच देवदूत ठरलेत,'' ही भावना आहे किवळेतील उद्योजक अशोक तरस यांची. 

लोकहो, आता... ‘शिस्त देवो भवः’​

अन्नाची चव कळत नव्हती. काही खावेसेच वाटत नव्हते. दोन दिवस असेच गेले. याबाबत मित्र कुंडलिक आमले आणि अजय रोकडे यांना सांगितली. अँटिजेन टेस्ट केली. रिपोर्ट पॉझिटीव्ह. पुढे काय? असा प्रश्‍न निर्माण झाला. खर्चाची चिंता नव्हती. कारण, हाती मेडिक्‍लेम पॉलिसी होती. चिंता होती, उपचार कुठे घ्यायचे याची. तरस बोलत होते. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील मोठमोठ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची नावे चर्चेत आली. अजयने नाव सूचविले वायसीएम. शिवाय, कुंडलिकही तिथेच वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (एमएसडब्ल्यू) आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना रुग्ण आणि नातेवाइकांचे समुपदेशन करतोय. शिवाय, तो समोर असल्याने मोठा आधार मिळेल, म्हणून वायसीएममध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला आणि सात दिवसांच्या उपचाराने पूर्ण बरा झालो. एक पैसाही खर्च झाला नाही. 

टाकाऊ वस्तूंपासून यश कांबळे याने बनविली अफलातून उपकरणे​

मित्र कुंडलिक आमले म्हणाले... 
गेल्या सहा महिने कोरोनाबाबत उपचारांचा साक्षीदार आहे. त्यामुळे माझ्या घरातील रुग्णास वायसीएममध्येच योग्य उपचार होतील, याची खात्री होती. अशोकने 20 लाखांची पॉलिसी माझ्या हाती सोपविली. 'तू सांगशील तिथे घेऊन चल, अधिक पैसे लागले, तरी काळजी करू नको. फक्त लवकर बरे कर,' असे म्हणाला. त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आम्हीही भावूक झालो. नको ती शंका मनात आली. पण, सर्व आयुष्याचा निर्णय एका मिनिटात घेणे शक्‍य नव्हते. अजयने, 'वायसीएममध्ये जाऊ आणि उपचार करू,' असे सुचविले. त्यावर 'फार विचार करू नको. तू समोर असल्यास मी लवकर बरा होईन' असा विश्‍वास अशोकने दाखवला.

पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; आता निवडा तुमच्या पसंतीचं परीक्षा केंद्र!​

आम्ही तिघे मित्र गाडीत बसलो. सरळ वायसीएम गाठले. कक्ष क्रमांक 503. उपचार सुरू झाले. एक्‍स-रे मध्ये न्युमोनिया दिसला. पुढील तपासण्या झाल्या. प्लाझ्मा देण्याची तयारी ठेवली. दुसऱ्या दिवशी ऑक्‍सिजन प्रमाण 95 ते 98 च्या दरम्यान राहिले. समुपदेशन करून त्याच्या मनातली भीती घालवली. तिसऱ्या दिवशीच प्रकृतीत अधिकच सुधारणा दिसली. उलट अशोक स्वतःच अन्य रुग्णांचे समुपदेशन करीत होता. त्यांना जेवण, औषधे नेऊन देत होता. सात दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळाला. एका उद्योजकाने वायसीएममध्ये उपचार घेणे मोठी बाब होती. 

कोरोनावर मात करायची असेल, तर वेळेवर उपचार आवश्‍यक आहे. मला कोरोना झाल्याचे कळले, तेव्हा मनातून खचलो, पण मित्रांनी आधार दिला. त्यांच्यासह डॉक्‍टरांनी दिलेलं मानसिक, शाब्दिक पाठबळ महत्त्वाचे ठरले. घाबरणाऱ्याला आपुलकीनं आधार देणं गरजेचे असल्याची शिकवण मिळाली. मास्क वापरण्याचे महत्त्व कळाले. 
- अशोक तरस, उद्योजक, किवळे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Businessman expressed his feeling that YCM Hospital and friends became angels in recovering from Corona