याला म्हणतात शेतकरी; पोळा साजरा केला, पण बैलांना मास्क लावूनच

ज्ञानेश्वर वाघमारे
Thursday, 17 September 2020

- नारळ तोडण्याची स्पर्धा कोरोनामुळे खंडित 

वडगाव मावळा : दरवर्षी वाजत-गाजत व मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा बैलपोळ्याचा सण यंदा कोरोनाच्या सावटामुळे शेतकऱ्यांनी अतिशय साध्या पद्धतीने घरीच साजरा केला. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांच्या कुटुंबीयांनी बैलांना मास्क लावून त्यांचे पूजन केले व कोरोना जनजागृतीचा संदेश दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बळीराजाच्या आवडीचा असलेला बैलपोळ्याचा सण वडगाव परिसरात दरवर्षी अतिशय उत्साहात व धुमधडाक्यात साजरा केला जातो. बैलांना सजवून वाद्यपथकांसह मिरवणुका काढल्या जातात. येथील चावडी चौकात बैलांच्या शिंगांना बांधलेले नारळ तोडण्याचा पारंपरिक खेळ रंगतो. परंतु, यंदा या सणावरही कोरोनामुळे निर्बंध आले. येथील पोटोबा देवस्थानने बैलपोळा साधेपणाने घरीच साजरा करण्याचे व बैलांना दर्शनासाठी मंदिर परिसरात न आणण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांनी यंदाचा बैलपोळा घरीच साजरा केला. देवस्थानच्या वतीने चावडी चौकात मातीच्या बैलांचे परंपरेनुसार पूजन करण्यात आले. विश्वस्त सचिव अनंता कुडे, पुजारी मयूर गुरव, रमेश ढोरे, अमोल पगडे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी बैलांना सजवून गोठ्यातच त्यांचे पूजन केले. त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य खाऊ घातला. घरोघरी मातीच्या बैलांचे पूजन करण्यात आले.

कोरोनाचा संदेश 

जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती व प्रसिद्ध बैलगाडा मालक बाबूराव वायकर यांनीही घरीच साधेपणाने बैलपोळा साजरा केला. कुटुंबातील महिलांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बैलांचे पूजन केले. माणसांप्रमाणे जनावरांनाही कोरोनाचा धोका असल्याने बैलांनाही मास्क लावले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे. मास्कचा वापर करावा. घरीच सुरक्षित राहावे असा संदेश बैलपोळ्याच्या सणातून दिला. 

   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrate the pola by masking the bulls in maval