चंद्रकांत पाटील यांच्या सुसंस्कृतपणाबद्दल शंका - अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

भाजपाचे नेते आणि राज्य सरकारचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच ‘आई-वडिलांना शिव्या द्या पण; पंतप्रधान मोदी व शहा यांना काही म्हणू नका’, असे वक्तव्य पुण्यातील पक्षाच्या मेळाव्यात केले होते.

चंद्रकांत पाटील यांच्या सुसंस्कृतपणाबद्दल शंका - अजित पवार

पिंपरी - आपण एखाद्या संविधानिक पदावर असल्यानंतर अशा पद्धतीने बोलणे चुकीचे आहे. उच्च व तंतत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीआई-वडीलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना सुसंस्कृतपणा आहे की नाही याची शंका येते. स्वत:च्या आई वडिलांबाबत असे वक्तव्य करणे म्हणजे ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ असल्याचा टोला विधानसभेतील विरोधी अजित पवार यांनी शनिवारी (ता. ८) पत्रकारांशी बोलताना लगावला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत शहरातील हाउसिंग सोसायटी धारकांच्या विविध समस्यां आणि शहरातील प्रलंबित प्रश्नांवर बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तर देताना पवार बोलत होते. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल, मंगला कदम, शाम लांडे, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे आदी उपस्थित होते.

भाजपाचे नेते आणि राज्य सरकारचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच ‘आई-वडिलांना शिव्या द्या पण; पंतप्रधान मोदी व शहा यांना काही म्हणू नका’, असे वक्तव्य पुण्यातील पक्षाच्या मेळाव्यात केले होते. तसेच; कोल्हापुर मध्ये आई वरुन शिवी देण्याची परंपरा असल्याचे ही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत अजित पवार म्हणाले, पाटिल यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री केल्याने ते नाराज आहेत. आई-वडिलांना शिव्या द्या पण; पंतप्रधान मोदी व शहा यांना काही म्हणू नका, असे वक्तव्य करणे दुर्देवी आहे.

राज्य सरकार महापालिकांच्या निवडणूका घेण्याच्या मूडमध्ये नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. राज्य सरकार सद्यस्थितीत महापालिकांच्या निवडणुका घेण्याच्या मूडमध्ये नाही. त्यांना कोणत्याही परिस्थितीत निवडणुका लांबवायच्या आहेत. अनेक महापालिकांची मुदत संपली आहे. मुदत संपल्यानंतर त्याठिकाणी किती दिवस प्रशासन ठेवायचे यालाही मर्यादा असतात. आता कोरोनाही संपला आहे. तुम्ही मुंबईमध्ये पोटनिवडणुक लावू शकता मात्र, महापालिका निवडणुका घेत नाही यावरून सर्व प्रकार लक्षात येतो. सद्यस्थितीत इच्छुकांचाही खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यांनी आता खर्चाला थोडा आवर घालावा, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

... शिंदे-फडणवीस सरकारकडून दुसरी अपेक्षा नाही

राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या बाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार कडून या पेक्षा वेगळी काही अपेक्षा नाही. नाशिक येथे झालेला अपघात दुर्दैवी असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकार कडून अपघातातील मयतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये मदत जाहिर करण्यात आली आहे. एकीकडे दहीहंडीच्या गोविंदा साठी १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे तर; दुसरी कडे भीषण अपघातांत मरण पावलेल्या नागरिकांसाठी ५ लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले. आर्थिक मदतीत असा भेदभाव करणे चुकीचे आहे, असे सांगत पवार यांनी नाशिक अपघातातील मयत आणि जखमी नागरिकांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्याची मागणीही केली.