
Hindu Janagarjana Morcha : पिंपरीतील वाबटुक मार्गात रविवारी बदल
पिंपरी : सकल हिंदू समाज समन्वय समिती पिंपरी-चिंचवड यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी रविवारी (ता. १८) पिंपरीत हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन केले आहे. यामुळे पिंपरी व चिंचवड येथील मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा मोर्चा चिंचवड स्टेशन येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक, महावीर चौक ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान निघणार आहे. त्यामुळे महावीर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे सेवा रस्त्याने येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असून ही वाहने डी मार्ट येथील ग्रेडसेपटरमधून जातील. नाशिक फाट्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे सेवा रस्त्याने येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असून ही वाहने डेअरी फार्म व खराळवाडीतील एच. पी. पंप येथून ग्रेडसेपरेटरमध्ये जातील.
स्व. राजीव गांधी पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे येणारी वाहने मोरवाडी चौकमार्गे इच्छितस्थळी जातील. नेहरूनगर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे येणारी वाहने एच.ए. कॉर्नर बस थांबा येथून रसरंग चौक, ऑटो क्लस्टरकडे वळून पुढे जातील. केएसबी चौक व बसवेश्वर चौकाकडून महावीर चौकात येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असून ही वाहने ऑटो क्लस्टरपासून सेंट मदर टेरेसा पुलावरून काळेवाडी मार्गे इच्छितस्थळी जातील. केएसबी चौक व सम्राट चौकाकडून पिंपरी चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असून ही वाहने अजमेरा कॉलनी-रसरंग चौक-नेहरूनगर मार्गे पुढे जातील. भक्ती-शक्ती, खंडोबामाळ चौकाकडून येणारी वाहने चिंचवड येथील चर्च समोरून ग्रेडसेपरेटरमध्ये जातील. रिव्हरव्ह्यू चौक, चापेकर चौकाकडून महावीर चौक मार्गे पिंपरी चौकाकडे येणारी वाहने महावीर चौक , छत्रपती चौक मार्गे पुढे जातील. हा बदल रविवारी (ता. १८) सकाळी आठ ते दुपारी बारा या कालावधीसाठी असेल. तरी वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.