Chikhali News : दुकाने, गोदामांचा प्रश्न ऐरणीवर! पूर्णानगरमधील अनधिकृत पोटमाळे बेतताहेत जिवावर

पूर्णानगरमधील आगीत चार जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याने अनधिकृत दुकानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Police Officer
Police OfficerSakal

चिखली - पूर्णानगरमधील आगीत चार जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याने अनधिकृत दुकानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांशी दोन मजली दुकानाच्या पोटमाळ्यावर अनधिकृत बांधकामे करण्यात आलेली असून, पोटमाळ्याचा वापर राहण्यासाठी किंवा इतर कामासाठी केला जात आहे.

हा प्रकार पूर्णतः अनधिकृत असून, महापालिकेने ज्या कामासाठी परवाना दिलेला आहे. त्याच कामासाठी त्याचा उपयोग होणे गरजेचे आहे. तरच अशा घटना टाळता येतील, असे पिंपरी-चिंचवड महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे म्हणणे आहे.

पूर्णानगर येथे बुधवारी पहाटे दुकानाला लागलेल्या आगीत दुकानाचे मालक चिमणाराम चौधरी त्यांच्या पत्नी नम्रता, मुलगा भावेश आणि सचिन यांना आपले प्राण गमवावे लागले. दोन मजली दुकानावर पोटमाळा टाकून ते दुकानाच्या वरच्या भागात राहत होते. मात्र, दुकानातून बाहेर येण्या-जाण्यासाठी एकच मार्ग होता. तर घरच्यांना वर जाण्यासाठी पार्किंगच्या बाजूने एक वेगळे शटर होते. परंतु तेही बंद होते. दुकानातील पेंटिंगच्या डब्यांमुळे व रसायनांमुळे आगीने थोड्याच वेळात तीव्र स्वरूप धारण केले.

स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्या

कोणताही मोठा व्यवसाय करीत असताना स्वतःच्या सुरक्षेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. आपत्कालीन स्थिती उद्‍भवल्यास बाहेर पडण्यासाठी दुसरा दरवाजा अथवा मोठ्या खिडकीसारखा मार्ग असणे आवश्यक आहे. तसे असते तर चौधरी कुटुंब वाचू शकले असते, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कुदळवाडीत अशी अनेक दुकाने व गोदामे

कुदळवाडी येथे पुढील बाजूस दुकान आणि मागे किंवा दुकानाच्या वरच्या जागेत अनेक व्यावसायिक राहण्यास आहेत. येथील भंगाराच्या गोदामात शेकडो कामगार राहतात. या गोदामांना चिंचोळा एकच मार्ग असतो. त्यामुळे तेथेही आगीची दुर्घटना घडल्यास मोठी जीवित हानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अनधिकृत बांधकामांचा सपाटा

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी दोन मजली दुकानांमध्ये अनधिकृत बांधकाम करून किंवा पोटमाळा काढून व्यवसाय केले जातात. हा प्रकार पूर्णतः अनधिकृत असल्याचे महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाचे म्हणणे आहे. घर भाड्याचे पैसे वाचले जावेत, जास्तीत जास्त वेळ दुकान सुरू ठेऊन व्यवसाय करता यावा, हा त्यामागील उद्देश असतो.

मात्र, व्यवसाय करताना स्वतःची सुरक्षा ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर शहरात गुंठा अर्धा गुंठा जागा घेऊन अनधिकृत बांधकामे करण्यात आलेली आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात अशी बांधकामे करण्याचा सपाटा या भागात सुरू आहे. मात्र, अर्ध्या किंवा एक गुंठ्यात चार ते पाच मजली बांधकाम करताना कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही.

आयुक्त सिंह यांनी दिली भेट

पूर्णानगर येथील घटनेबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. या दुर्घटनेचे वृत्त समजताच आयुक्त सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

शॉर्टसर्किट झाले नसल्याचा ‘महावितरण’चा दावा

१ पूर्णानगर येथे बुधवारी सचिन हार्डवेअर ॲण्ड इलेक्ट्रिकल्सच्या दुकानात आग लागल्याची माहिती मिळताच पहाटे सहाच्या सुमारास इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

२ ‘महावितरण’च्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यात वीजमीटरपर्यंत पुरवठा सुरळीत असल्याचे तसेच वीजमीटर व सर्व्हिस वायर सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले.

३ ‘महावितरण’च्या यंत्रणेमधून कोणत्याही प्रकारचे शॉर्टसर्किट झाले नसल्याचे या प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. या घटनेची पुढील चौकशी विविध सरकारी यंत्रणेच्या संयुक्त समितीकडून करण्यात येणार आहे.

दुमजली दुकाने पोटमाळा बनवून त्याचा उपयोग घरगुती वापरासाठी किंवा राहण्यासाठी करणे अयोग्य आहे. ते अनधिकृत आहे. तसेच अशा दुकानांना आपत्कालीन स्थिती उद्‍भवल्यास पर्यायी मार्ग किंवा मोठी खिडकी असणे आवश्यक आहे.

- यू. एम. वानखेडे, उपअग्निशमन अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

वाढीव बांधकाम करणे अनधिकृत आहे. त्याला महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जात नाही. अशी बांधकामे धोकादायक ठरतात. नागरिकांनी याचा विचार करून बांधकाम परवान्यानुसारच बांधकाम करावे.

- राजेंद्र राणे, कार्यकारी अभियंता, बांधकाम परवाना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com