
भोसरी - ‘नशीब बलवत्तर म्हणून माझा भाचा वाचला. भोसरीतील क्वालिटी सर्कलजवळील गणेशनगरमध्ये असलेल्या उघड्या डीपीचा (फीडर पिलर) धक्का बसून बालाजीनगरमध्ये राहणारा माझा भाचा प्रेम शंकर चौगुले (वय १४) भाजून गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने दवाखान्यात नेल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, अद्यापही महावितरणच्या एकाही अधिकाऱ्याने संपर्क साधला नाही. या डीपीमध्ये याआधीही दोन-तीन वेळा स्फोट झाले होते. कर्मचाऱ्यांद्वारे दुरुस्ती करून झाकणे उघडेच ठेवण्यात येते,’’ असे राहुल कुऱ्हाडे सांगत होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनामुळे शाळा बंद आहेत, त्यामुळे प्रेम हा मामा राहुल यांच्या कॅंटिनवर सरबत बनविण्याचे काम करत होता. मंगळवारी (ता. २३) प्रेम हा लघुशंकेसाठी विद्युत डीपीजवळ गेला. मात्र, तेथून निघताना त्याचा पाय दगडात अडकून तोल गेला, त्यात त्याचा हात उघड्या डीपीमधील वायरला लागला. त्याक्षणी मोठा स्फोट झाला. यामध्ये प्रेमचा उजवा हात, पाठ व पोट जळाले, असे कुऱ्हाडे यांनी सांगितले. सध्या त्याच्यावर चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचा उजवा हात पूर्णपणे भाजला असून, या हातावर गुरुवारी (ता. २५) शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रेमचे आई-वडील साफसफाईचे काम करतात.
आतापर्यंत प्रेमच्या उपचारावर एक लाख रुपये खर्च झाला आहे. घरातील दागिने गहाण ठेवून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्याच्या उजव्या हातावरील शस्त्रक्रियेला सुमारे सत्तर हजार रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे चौगुले आणि कुऱ्हाडे कुटुंबीय चिंतेत आहेत. दरम्यान, महावितरणच्या गलथान कारभारामुळेच ही घटना घडली आहे. त्यामुळे दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध यांनी भोसरी पोलिस ठाण्यात निवेदन देऊन केली आहे. महावितरणचा फीडर पिलर सुस्थितीत आहे. त्याची झाकणेही लावलेली आहेत. त्याचप्रमाणे आतील संरक्षित जाळीही सुस्थितीत आहे. त्यामुळे या घडलेल्या अपघाताची चौकशी विद्युत निरीक्षकांद्वारे करण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालानंतरच ही घटना स्पष्ट होईल. अहवालानंतरच दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.
डीपी बॉक्स उघडेच...
क्वालिटी सर्कल हा परिसर भोसरी एमआयडीसीमध्ये येतो. भोसरी एमआयडीसी परिसरात बऱ्याच ठिकाणी डीपी बॉक्स उघडे आहेत. या संदर्भात ‘सकाळ’ने सातत्याने प्रश्न मांडला आहे.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.