
आरोपीच्या नातेवाइकांनी पोलिस उपनिरीक्षकासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण केली.
पिंपरी : नवी दिल्ली येथे दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात पटियाला हाऊस कोर्टाने एका आरोपीला वॉरंट बजावले. त्या गुन्ह्यातील आरोपी चिखली परिसरात राहत असल्याने आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी दिल्ली पोलिस आरोपीच्या चिखली येथील घरी गेले. त्यावेळी आरोपीच्या नातेवाइकांनी पोलिस उपनिरीक्षकासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण केली. हा प्रकार चिखलीतील रामदासनगर येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
संदीप रामदास साबळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह कमल रामदास साबळे, सुनीता संदीप साबळे, सरिता दीपक साबळे (सर्व रा. रामदासनगर, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक नरेंदरकुमार नंदलाल सहरावत (वय 39, रा. नवी दिल्ली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मागील वर्षी 2019 मध्ये नवी दिल्ली येथील पार्लेमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यातील आरोपी दीपक साबळे याला पटियाला हाऊस कोर्टाने नॉनबेलेबल वॉरंट बजावले आहे.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दीपक हा चिखली परिसरात राहत आहे. नवी दिल्ली पोलिस दलातील स्पेशल स्टाफमध्ये कार्यरत असलेले फिर्यादी सहरावत यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक न्यायालयाने बजावलेले वॉरंट बजावण्यासाठी दिल्लीहून बुधवारी (ता. 16) दुपारी तीनच्या सुमारास दीपक याच्या घरी आले. त्यावेळी दीपकचे नातेवाईक आरोपी संदीप, कमल, सरिता, सुनीता यांनी आपसात संगनमत करून दीपक याचा काहीही ठावठिकाणा सांगितला नाही. तसेच, घराचे लोखंडी गेट जोरात ओढून घेतले. त्यात उपनिरीक्षक सहरावत यांच्या उजव्या हाताची बोटे गेटमध्ये अडकून दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी सहरावत यांच्या डाव्या हाताची बोटे पिरगळुन डोक्यात बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, आरोपींनी सहरावत व त्यांचे सहकारी संजीव यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत चिखली पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून संदीप साबळे याला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा