
Chinchwad By Election : चिंचवडमध्ये होणार तिरंगी लढत; कलाटे यांची उमेदवारी कायम
पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवारी (ता. १०) महाविकास आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा अर्ज कायम राहिला. त्यामुळे या मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये पाच जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने आता रिंगणात २८ उमेदवार राहिले आहेत.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेपक्षाचे पुणे
भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी कॅांग्रेसचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.
या निवडणुकीत ४० पैकी ३३ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले होते. त्यानंतर उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. या कालावधीत पाच जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार राहिले आहेत.
आज अर्ज माघे घेतलेले उमेदवारांमध्ये राजेंद्र मारूती काटे, भाऊसाहेब रामचंद्र अडागळे, संभाजी ब्रिगेडचे प्रविण अशोक कदम, अॅड. मनिषा मनोहर कारंडे, रविंद्र पारधे (सर) यांचा समावेश आहे.
कलाटे यांच्यावर माघार घेण्यासाठी दबाव
जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन आहेर आज सकाळी कलाटेंना वाकड येथील त्यांच्या कार्यालयात भेटले. बंद दाराआड चर्चा करताना उध्दव ठाकरे यांचे मोबाईलवरून कलाटेंशी बोलने झाले. त्यानंतर राष्ट्रवादी कॅांग्रंसचे स्थानिक नेते योगेश बहल व मोरेश्वर भोंडवे यांनी कलाटे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान कलाटे राष्ट्रवादीचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष किशोर भेगडेंबरोबर अज्ञात स्थळी रवाना झाले.
दुपारी पावणे तीनच्या सुमारास वाकड येथील कार्यालयात आले. तत्पुर्वी पाच मिनीटे आधी माजी आमदार विलास लांडे, संजोग वाघेरे कलाटे यांच्या कार्यालयाजवळ आले होते. त्यांनीही शवटचा शिष्टाईचा प्रयत्न केला. पण, ही शिष्टाईही असफल ठरली. अखेर तीन वाजता पत्रकारांसमोर येऊन कलाटे यांनी आपण निवडणुक लढवित असल्याचे जाहिर केले.
उध्दव ठाकरे, अजित पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. कार्यकर्यांचा रेटा व जनतेची लोकभावना, जनतेचा मला असलेला पाठींबा याचा आदर करत मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. नुरा कुस्ती होऊ नये म्हणून मी लढत आहे. माझी उमेदवारी कापल्यामुळे मलाच सहानुभूती आहे.
- राहुल कलाटे, अपक्ष उमेदवार.
खरे तर ही पोटनिवडणूक लागायलाच नको होती. लक्ष्मण जगताप यांचे या भागात मोठे कार्य आहे. लोकांचा मला खुप चांगला प्रतिसाद आहे. प्रचारात फिरताना लोक म्हणतात तुम्ही प्रचाराला इकडे येऊ नका, हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे प्रचंड जनसमुदाय माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे तिरंगी लढत झाली तरी विजय आमचाच आहे.
- अश्विनी जगताप, भाजपा उमेदवार
तिरंगी लढतीचा काही विषय नाही. महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा व कॉंग्रेसचा मला पाठींबा आहे. सचिन अहिर यांनी आज शिवसैनिकांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याबाबत सांगितले. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपाशी आमची लढत असून विजय माझाच आहे.
- विठ्ठल उर्फ नाना काटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार
काटे यांनी केली कलाटे यांना चिन्हासाठी मदत
अपक्ष उमेदवारांचे चिन्ह वाटप आज झाले. यावेळी महाविकास आघाडीचे बंडखोर, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी शिट्टी चिन्ह मागितले होते. त्याचवेळी सांगवीतील फुलवाले राजेंद्र काटे यांनीही शिट्टी चिन्ह मागितले होते. परंतु; राजेंद्र काटे यांनी अगोदर मागितल्याने त्यांचा दावा प्रथम होता. परंतु; त्यांनी माघार घेतल्याने दुसऱ्या क्रमांकाचे दावेदार कलाटे यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले. त्यामुळे फुलवाल्या काट्यांची कलाटे यांना अप्रत्यक्षपणे मदत झाल्याची चर्चा निवडणूक कार्यालय परिसरात होती.
कलाटे यांचे कार्यालय नाट्यमय घडामोडींच्या केंद्रस्थानी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा दिवस असल्याने सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचे वाकड येथील कार्यालय राजकारणातील नाट्यमय घडामोडींचे केंद्रस्थान झाले होेते. सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान सचिन अहिर आले. त्यांनी सुमारे तासभर चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरातील व मावळातील स्थानिक नेत्यांची रिघ लागली.