Voting Public Awareness
Voting Public Awarenesssakal

Chinchwad Vidhansabha Byelection : चिंचवड मतदारसंघात नवमतदार व तरुणाईच्या काय अपेक्षा आहेत?

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदारपणे सुरू आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ४९ हजार ५७९ मतदार वाढले आहेत.
Summary

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदारपणे सुरू आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ४९ हजार ५७९ मतदार वाढले आहेत.

पिंपरी - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदारपणे सुरू आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ४९ हजार ५७९ मतदार वाढले आहेत. त्यात काही स्थलांतरीत तर बहुतांश नवमतदार अर्थात पहिल्यांदाच मतदार करणाऱ्या तरुणाईचा समावेश आहे. त्यांच्यामते आपला आमदार कसा असावा? आमदाराकडून काय अपेक्षा आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने केला. त्यातून त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट, क्रीडांगणे, मैदाने, सुसज्ज रस्ते, मुबलक पाणी, उद्याने असावेत; अभ्यासू, सुजाण, जनतेचे प्रश्न सोडविणारा लोकप्रतिनिधी असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मतदान यंत्रांची सरमिसळ पूर्ण

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी सर्व मतदान यंत्रांची संगणकीय पद्धतीने मतदान केंद्रनिहाय द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आली.

निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सरमिसळ केलेल्या यंत्रांची अंतिम यादी जाहीर केली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, निवडणूक सहायक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, प्रशांत शिंपी, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी बापू गायकवाड, थॉमस नरोन्हा, माध्यम कक्ष समन्वय अधिकारी किरण गायकवाड, नायब तहसीलदार संतोष सोनवणे, जिल्हा सूचना अधिकारी प्रमोद बोरोले आदी उपस्थित होते.

यंत्रांची तपासणी पूर्ण

चिंचवड विधानसभा संघात २८ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी दोन बॅलेट युनिटची आवश्यकता असेल. त्यामुळे निवडणूक आयोगाने कोल्हापूर जिल्ह्यातील अतिरिक्त बॅलेट युनिट उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या भोसरी येथील गोदामात बॅलेट युनिटची प्रथमस्तरीय पुरवणी तपासणी करण्यात आली.

विद्यार्थिनी म्हणतात...

मतदान करण्यासाठी खूप उत्सुक आहे. विकासासाठी काम करणारा उमेदवार निवडून यावा. महिला, मुलींसाठी सुरक्षित पब्लिक ट्रान्सपोर्टला प्राधान्य द्यावे. त्यासाठी काम केले पाहिजे.

- सानिका रुद्रवार

मतदान हा मूलभूत हक्क आहे, हे शाळेपासून शिकत आलोय. आमच्या मताने योग्य उमेदवारास संधी मिळणार आहे. निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तरुणांच्या खूप अपेक्षा आहेत.

- मिहिका गर्ग

लहानपणापासून मतदान प्रक्रिया पहात आले आहे. आपणही कधीतरी मतदान करणार, असे वाटायचे. तो क्षण प्रत्यक्षात येणार आहे. पुढेही मतदान करणार आहे. आनंद वाटतो आहे.

- दीपाली कांबळे

विद्यार्थ्यांसाठी प्रभागात स्पेशल लायब्ररी असाव्यात. स्टडी रुम असल्यास अभ्यास करणे सोपे जाईल. निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून विद्यार्थ्यांसाठी अश्या सुविधा अपेक्षित आहेत.

- नंदिनी राजेश

विद्यार्थी म्हणतात...

खेळासाठी मैदान असावे. आमच्या पिढीतील मुलांना जागेअभावी कित्येकदा मनासारखे मैदानी खेळ खेळता येत नाहीत. तरुणांसाठी अशा प्रकारच्या सुविधा मिळतील, ही अपेक्षा.

- रिशी राय

मी पहिल्यांदा मतदान करत आहे. तर मला माझा उमेदवाराकडून खूप अपेक्षा आहेत. नव्या उमेदवारांनी जुन्या राजकारण्यासारखे वागू नये. नवीन धोरणात्मक कामे करावीत.

- सागर मस्के

स्थानिक समस्या सोडविणारा आमदार हवाय. मतदार संघात नेमक्या समस्या काय आहेत, याची माहिती त्यांना असायला हवी. अनेक असुविधा, समस्या आहेत. त्या सोडवाव्यात.

- प्रियांशू यादव

चिंचवड मतदारसंघातील जनतेला विकासाची प्रतिक्षा आहे. बिनधास्त काम करणारा आमदार हवाय. नोकरी, शिक्षण आणि नागरी समस्यांचे समाधान करणारा आमदार असावा.

- सार्थक बाराथे

खेळाडू म्हणतात...

मी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे. माझ्यासाठी हा खास क्षण असेल. भावी आमदारांनी नागरी सुविधांवर भर द्यावा. निव्वळ स्वतःच्या प्रभागातील प्रश्‍न सोडवू नयेत.

- अश्फाक तांबोळी

मतदान हा विशेषाधिकार आहे. त्यात देशभक्ती व जबाबदारीची भावना आहे. समाज व देशाचे भविष्य घडवेल, असा उमेदवार असावा. सार्वजनिक वाहतुक सुविधा पुरेशी असावी.

- आदित्य बुक्की

नवमतदार म्हणतात...

माहेरी असताना मतदार नोंदणी केली नव्हती. लग्नानंतर पहिल्यांदाच मतदार नोंदणी केली आहे. मतदानाबाबत मनात उत्सुकता आहे. निवडून येणाऱ्यांनी नागरी सुविधांना प्राधान्य द्यावे.

- निलू जगधने, गृहिणी

नवनिर्वाचित आमदार सर्व अनधिकृत, बेकायदेशीर आणि अस्वच्छ कृतींना प्रतिबंध करणारा असावा. समस्या सोडविणारा असावा. सार्वजनिक वाहतुक सुविधा पुरवाव्यात.

- विनय लेले, युवक

मतदानाची टक्केवारी वाढविण्याची सूचना

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांची तपासणी केली. मतदान सुरळीत पार पडण्यासाठी केंद्रामध्ये आवश्यक सुविधा पुरविणे व रचनेबाबत संबंधित अधिकारी व समन्वयकांना मार्गदर्शन केले. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत कमी मतदान झालेल्या भागात विशेष मोहीम राबवून मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्याची सूचनाही एस. सत्यनारायण यांनी केली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष पोरेडी, समन्वयक थॉमस नरोन्हा, उत्तम भारती, अशोक कुटे आदी उपस्थित होते.

सेंट जॉर्ज इंग्लिश मीडियम स्कूल मामुर्डी, विद्याभूवन स्कूल विकासनगर किवळे, जयवंत प्राथमिक शाळा व दिवंगत मनीषा भोईर विरंगुळा केंद्र भोईरनगर चिंचवड, महापालिका शाळा पुनावळे, महात्मा फुले प्राथमिक शाळा व मरहूम फकिरभाई पानसरे उर्दू विद्यालय चिंचवड, यशवंतराव चव्हाण विद्यालय थेरगाव, पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल व महापालिका शाळा पिंपळे सौदागर; जी. के. गुरुकुल, महापालिका शाळा पिंपळे निलख, महापालिका शाळा पिंपळे गुरव आणि विद्याविनय निकेतन शाळा विशालनगर या मतदान केंद्रांची पाहणी सत्यनारायण यांनी केली.

असे आहेत यंत्र

  • २९०७ - एकूण यंत्र

  • १४२८ - बॅलेट युनिट

  • ७१४ - कंट्रोल युनिट

  • ७६५ - व्हीव्हीपॅट यंत्र

चार्ली चॅप्लिनच्या वेशात मतदार जनजागृती

निवडणूक विभागामार्फत व्यापक मतदान जनजागृती अभियानास मंगळवारी (ता. १४) प्रारंभ झाला. त्याअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघ परिसरातून मोठ्या उत्साहात कलाचन ग्रुप कला मंडळाने आणि वरप्रभ शिरगावकर यांनी चार्ली चॅप्लिनच्या वेशामध्ये मतदार जनजागृती केली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्वेता आल्हाट यांच्या सूचनेनुसार मतदारसंघातील विविध भागात मतदार जागृती करण्यात येत आहे. कलाचन ग्रुप कला मंडळाने काळेवाडी व थेरगाव परिसरात गर्दीच्या ठिकाणी, तसेच प्रमुख चौक आणि सोसायट्यांच्या परिसरात गायन आणि पथनाट्याद्वारे मतदानाबाबत जागृती केली. मतदानाचा संदेश देणाऱ्या ‘चार्ली’ने परिसरातील डॉक्टर, युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या सूचनेनुसार मतदान सुरळीत पार पडण्यासाठी आणि कमी मतदान होणाऱ्या भागांवर लक्ष केंद्रित करून मतदार जागृती मोहीम राबविली जात आहे. यासाठी कलापथके, सांस्कृतिक कार्यक्रम करणारे समूह, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवक यांचा सहभाग घेण्यात येत आहे. सार्वजनिक इमारती, रुग्णालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांच्या परिसरात तसेच विविध सोसायट्यांमधून छोट्या- छोट्या कार्यक्रमाद्वारे, पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com