सोमाटणे टोलनाक्यावरील वसुलीबाबत बैठक फिसकटली; निर्णय घेण्यास शनिवारची डेडलाईन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 February 2021

- निर्णय न झाल्यास आंदोलन
- टोलवसुलीबाबत झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेते आक्रमक

तळेगाव दाभाडे (ता. मावळ) : आयआरबी कंपनीकडून सोमाटणे टोल नाक्‍यावर स्थानिकांकडून होणाऱ्या टोल वसुलीसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. मात्र, त्यातील बोलणी फिसकटली असून शनिवारपर्यंत (ता. २०) निर्णय झाला नाही, तर आयआरबी कंपनीविरोधात मोर्चा काढून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर केला. त्यामुळे आता कंपनी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तळेगाव पोलिस ठाण्यात याबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी निरीक्षक भास्कर जाधव, आयआरबी कंपनीचे देहूरोड व्यवस्थापक वामन राठोड, सोमाटणे फाट्याचे मॅनेजर महादेव तुपारे यांच्यासह गणेश काकडे, अमोल शेटे, किशोर आवारे, सुरेश चौधरी, किशोर भेगडे, निखिल भगत, विशाल वाळूंज, सचिन भांडवलकर, सुनील पवार, सुनील मोरे, मिलिंद अच्युत, डॉ. राम शहाणे, सर्व पक्षीय पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. सोमाटणे फाटा व त्यापुढील टोल नाक्‍यांमध्ये ३२ किलोमीटर अंतर आहे, तरी येथील टोल नाक्‍यावर स्थानिकांकडून नियमबाह्य टोल वसुली करण्यात येत आहे. त्यामुळे अनधिकृत टोल वसुलीप्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी केली. त्यावर राठोड यांनी वरिष्ठांना आपली भूमिका सांगतो व चर्चा करून निर्णय घेण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती केली.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नेत्यांनी दिला इशारा...
पोलिस निरीक्षक जाधव यांनी नेते मंडळींना विचार करावा अशी विनंती केल्याने शनिवारपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ देण्याचे संबंधितांनी मान्य केले. मात्र, दिलेल्या वेळेत निर्णय झाला नाही, तर रविवारी (ता. २१) मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नेत्यांनी दिला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens demands to irb for toll free on somatane toll plaza