पुनावळे कचराडेपोला तीव्र विरोध; स्थानिकांनी मोजणी थांबवली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 February 2021

पुनावळे येथील वनविभाग व खासगी जमिनीवर कचराडेपो करण्याचे विचाराधीन आहे.

पिंपरी : पुनावळे येथील वनविभाग व खासगी जमिनीवर कचराडेपो करण्याचे विचाराधीन आहे. त्यासाठी महापालिका नगररचना विभाग व पौड भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी जागेची मोजणी करण्यासाठी आले होते. मात्र, स्थानिक रहिवासी व जागा मालकांनी त्यांना कडाडून विरोध करून मोजणी बंद पाडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सध्या मोशीत कचरा डेपो आहे. मात्र, तो पूर्ण क्षमतेने भरत आला आहे. त्यामुळे पर्यायी जागेचा शोध महापालिकेकडून सुरू आहे. गेल्या आठ-दहा वर्षांपासून पुनावळे येथील वनविभागाच्या जागेत डेपो करण्याचा विचार सुरू आहे. त्याला स्थानिकांनी वेळोवेळी विरोध केला आहे. देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्गाच्या पश्‍चिमेस हे ठिकाण आहे. त्या ठिकाणी वनविभागाची सुमारे 57 एकर जमीन आहे. दगडखाण आहे. त्यासह खासगी 15 एकर जमीन घेऊन कचरा डेपो करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महापालिका नगररचना विभाग व पौड (मुळशी) भूमिअभिलेख कार्यालयाच्या अधिकारी जमीन मोजणीसाठी गेले होते. त्यांना स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी विरोध केला. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या चार-पाच वर्षांत या भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. काहींचे काम सुरू आहे. संपूर्ण परिसर निवासी क्षेत्र आहे. जवळच हिंजवडी आयटी पार्क आहे. मारुंजी, जांबे, पुनावळे, ताथवडे गावे आहेत. शिवाय, वर्षात सर्वाधिक काळ पश्‍चिमेकडून पुर्वेकडे वारे वाहतात. त्यामुळे कचरा डेपोच्या दुर्गंधीचा त्रास संपूर्ण शहराला होईल, अशी हरकत नागरिकांनी घेतली. कचरा डेपो शहराच्या पूर्वेकडे असावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचविले होते, याची आठवणही काही नागरिकांनी करून दिली. त्यामुळे नगररचना व भूमिअभिलेख अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले. कचरा डेपोसाठी जमीन मोजणीस स्थानिक नागरिक जालिंदर नवले, अतुल काटे, भरत काटे, विशाल काटे आदींनी हरकत घेतली असून पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पुनावळेतील जागेवर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारावा, यामुळे पुनावळे, ताथवडे, वाकड, थेरगाव भागातील पाण्याचा प्रश्‍न सुटेल, अशी भुमिका नगरसेवक राहुल कलाटे यांनी मांडली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुनावळेतील वनविभागाच्या जमिनीसह खासगी जागेवर कचरा डेपो उभारण्यास आमचा विरोध आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक राहायला येत असल्याने चांगले उद्यान उभारावे, दगड खाणीचे सुशोभिकरण करावे.
- विशाल काटे, पुनावळे, रहिवासी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens oppose to punawale garbage depo