
पिंपरी : महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेत मोठ्या आशेने गोरगरिबांनी अर्ज केले. परंतु, घरांच्या सोडतीच्या यादीत नाव न आल्याने अनेकांची निराशा झाली. मात्र, नागरिकांना आता नवनगर विकास प्राधिकरणाच्या घरांची आशा उरली आहे. कोरोनाने बिघडलेली आर्थिक गणिते आणि पैशाची चणचण गोरगरिबांना भासत आहे. प्राधिकरणाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी अनेकांच्या खिशात पैसाच उरला नाही. घरांसाठी भरलेल्या पैशाची कोणतीही तारीख अद्याप निश्चित नसल्याने गोरगरिबांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार याकडे २९ हजार ३८६ अर्जदारांचे डोळे लागले आहेत.
सध्या गोरगरिबांसाठी नवनगर विकास प्राधिकरणाने घरांची योजना जाहीर केली आहे. ऑनलाइन अर्जनोंदणी २६ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. तसेच ऑनलाइन पेमेंट स्वीकृती देखील याच दिवशी सुरू झाली आहे. मात्र, पैसे स्वीकारण्याची मुदत ३० मार्चला संपुष्टात येणार आहे. अनेकजण घरांच्या स्वप्नापासून पुन्हा वंचित राहतील, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत चऱ्होली १४४२, रावेत ९३४, बोऱ्हाडेवाडी १२८८ या घरांसाठी २७ फेब्रुवारीला ऑनलाइन संगणकीय सोडत घेण्यात आली होती. त्यासाठी ३६६४ सदनिकांसाठी ४८ हजार अधिक नागरिकांनी अर्ज भरले होते. पाच हजार रकमेचा डिमांड ड्राफ्ट जमा करण्यात आला होता. या योजनेत २०१७ मधील अर्जदारांचा समावेश आहे. अनेक दिव्यांग व दुर्बल घटकातील बांधवांनी अर्ज भरलेले आहेत. ज्या व्यक्तीच्या नावावर कुठेही घर नाही अशा नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. या नागरीकांना प्राधिकरणाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी अवघे बारा दिवस उरले आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ही आहे वस्तुस्थिती
- प्राधिकरणाच्या घरांमध्ये अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी १५६६ घरे उपलब्ध
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ३३१७ घरे उपलब्ध
- खात्यामध्ये पाच हजार रुपये रक्कम महापालिकेकडून जमा झाल्यास प्राधिकरणाच्या घरांसाठी अर्ज करता येणार
- अनेकांची नगरसेवकांकडे विनवण्या सुरू
- काही जण महापालिकेत जाऊन पैशांची करतात विचारणा
- तारीख अद्याप निश्चित न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम
‘‘कोरोनाने सर्वच ठप्प झाले आहे. घरांचे भाडे भरणे मुश्कील आहे. महापालिकेच्या घरासाठी दरवर्षी अर्ज करतो. नाव येत नाही. सध्या प्राधिकरणाच्या घरांची आशा उरली आहे. अर्ज करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. खात्यावर घरांसाठी भरलेली रक्कम लवकर मिळाल्यास आम्ही प्राधिकरणाच्या घरांसाठी अर्ज भरू शकतो.’’
- सुमीत कांबे, थेरगाव, नोकरदार
‘‘घरांच्या अर्जासाठी काडीमोड केली. लॉकाडाउनवेळी खिशात पैसे देखील नव्हते. पै-पै जमा करून अर्ज केला. आता खिशात दमडी नाही. दररेाजचा उदरनिर्वाह आमच्यासाठी अवघड झाला आहे. आम्हाला पैसे कधी मिळणार हे कोणी सांगत नाही.’’
- सीमा चव्हाण, निगडी, घरेलू कामगार
‘‘आम्ही नगरसेवकांकडे आणि महापालिकेतही पैशांसाठी विचारणा करत आहे. घरांसाठी अर्ज भरले त्याचे पैसे कधी मिळणार आहेत. ४५ दिवसांच्या आत पैसे जमा व्हायला हवेत. परंतु अद्यापपर्यंत मिळाले नाहीत.’’
- मंगल नाईक, कामगार, काळेवाडी
‘‘नागरिकांचे पैसे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होतील. संबंधित बॅंकेतून हे पैसे मिळतील. प्रक्रिया सुरू आहे.’’
- अण्णा बोदडे, झोपडपट्टी निर्मूलन विभाग, सहायक आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.