Pimpri : कोथिंबिरीची जुडी अवघी आठ रुपयांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोथिंबिर

कोथिंबिरीची जुडी अवघी आठ रुपयांवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या एक महिन्यापासून अवकाळी पावसादरम्यान कडाडलेला भाजीपाला गेल्या दोन दिवसांपासून स्वस्त झाला आहे. पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत कोथिंबीर जुडी ८० आणि मेथीची जुडी ४० रुपयांवर गेली होती. ती जुडी अवघ्या आठ ते दहा रुपयांना झाल्याने गृहिणींचा जीव भांड्यात पडला आहे. पेट्रोलियम पदार्थ तसेच घरगुती सिलिंडरचे दर व त्यातच पालेभाज्यांच्या महागाईमुळे गृहिणींनी जेवणातून पालेभाज्याच वर्ज्य केल्याचे दिसून आले होते.

गेल्या महिन्याभरात ऑक्टोबर हीट आणि अवकाळी पावसादरम्यान पालेभाज्यांच्या भाववाढीने उच्चांक गाठला होता. त्यामुळे, महिलांनी स्वयंपाकघरात दैनंदिन भाज्यांचे नियोजन करणे अवघड बसले होते. भाज्यांमध्ये कोथिंबिरीची फोडणीच गायब झाली होती. ८० रुपयांवर असलेली कोथिंबीर नंतर ५० रुपयांच्या आत आली. त्यानंतर २५ ते ४० रुपयांच्या दरम्यान विक्री होत होती. ती नोव्हेंबर महिन्यांतील दुसऱ्या आठवड्यांत १० रुपये जुडी झाली आहे. त्यातही फळभाज्या चांगल्याच महागल्या होत्या. त्याचबरोबर भेंडी, गवार, टोमॅटो महागलेलाच आहे. टोमॅटो मागील आठवड्यात ५० रुपये किलोंच्यावर झाला आहे.

पालेभाज्यांची मोठी आवक पिंपरी भाजी मंडईत पहावयास मिळाली. मात्र, एसटीचा संप सुरू असल्याने काही प्रमाणात गिऱ्हाईक मंदावले आहे. बरेच जण गावी अडकून पडले आहेत. त्यामुळे भाजी व्यवसायावर त्याचा परिणाम झाल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. सध्या कोथिंबीर व शेपू किमान सात रुपये भावाप्रमाणे विक्री आहे. मंडईत शेपू, पालक व कोथिंबिरीची आवक १५०० गड्डी इतकी मोठ्या प्रमाणात बुधवारी झाली होती. तर किरकोळ बाजारभावाने १० ते १२ रुपये प्रमाणे सर्वच पालेभाज्यांची विक्री सुरु आहे. तसेच पालक व अंबाडीची भाजीही सर्वाधिक १० रुपयाप्रमाणे स्वस्त होती. कांदापात देखील ३० रुपयांवरून १५ रुपयांवर आला. त्यामुळे, गेल्या दोन दिवसांत घरोघरी टेम्पो आणि हातगाडीवर विक्रीसाठी आलेला भाजीपाला खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे.

फळ व पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे पालेभाज्या खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी आहे. गेल्या महिन्यात पालेभाज्या महाग असल्याने विक्रीसाठीदेखील भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. अवकाळी पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. परंतु, आवक होऊनही गिऱ्हाईक नाही.

- संतोष बडे,

भाजी विक्रेता, भोसरी

loading image
go to top