मावळात आज कोरोनाबाधितांनी ओलांडला चार हजारांचा टप्पा

ज्ञानेश्वर वाघमारे
Tuesday, 22 September 2020

मावळ तालुक्यात मंगळवारी कोरोना रुग्ण संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात मंगळवारी कोरोना रुग्ण संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे त्यातील दोन हजार ९५० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात ९३१ सक्रिय रुग्ण आहेत.

मंगळवारी दिवसभरात ४९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित चौघांचा मृत्यू झाला. तळेगाव येथील ६५ वर्षीय व ५९ वर्षीय, लोणावळा येथील ७९ वर्षीय व कुसगाव बुद्रुक येथील ७२ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ४ हजार १२ व मृतांची संख्या १३१ झाली आहे. मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ४९  जणांमध्ये लोणावळा, वडगाव व तळेगाव दाभाडे ग्रामीणमधील प्रत्येकी आठ, तळेगाव दाभाडे व सोमाटणे येथील प्रत्येकी सात, चांदखेड, शिरगाव व कान्हे येथील प्रत्येकी दोन व माळवाडी, उर्से, इंदोरी, दारूंब्रे व शिवणे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. 

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार १२ झाली असून, त्यात शहरी भागातील दोन हजार ३१२ व ग्रामीण भागातील एक हजार ७०० जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक एक हजार २२३,  लोणावळा येथे ८४२, तर वडगाव येथे रुग्णसंख्या २४७ एवढी झाली आहे. आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन हजार ९५० जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी १४९ जणांना घरी सोडण्यात आले.

सध्या तालुक्यात ९३१ सक्रिय रुग्ण असून, त्यातील ५६५ लक्षणे असलेले, तर ३६६ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ५६५ जणांमध्ये ४३९ जणांमध्ये सौम्य व १२३ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. तीन जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ९३१ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients crossed four thousands in maval taluka