esakal | पिंपरीतील महापालिका रुग्णालय फुल्ल; कोरोना रुग्णांना मिळेना व्हेंटिलेटर बेड
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीतील महापालिका रुग्णालय फुल्ल; कोरोना रुग्णांना मिळेना व्हेंटिलेटर बेड
 • महापालिका रुग्णालयांतील स्थिती
 • महापालिका 52 बेड तातडीने वाढविणार 

पिंपरीतील महापालिका रुग्णालय फुल्ल; कोरोना रुग्णांना मिळेना व्हेंटिलेटर बेड

sakal_logo
By
पीतांबर लोहार

पिंपरी : कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र, जेवण करताना घशात त्रास व्हायचा. थोडी सूजही जाणवत होती. श्‍वास घेणे मुश्‍कील व्हायला लागले. घराजवळच महापालिकेचे वायसीएम रुग्णालय. परंतु, तेथील रुग्णसंख्या पाहता 'ऑक्‍सिजन', प्रसंगी 'व्हेंटिलेटर बेड' उपलब्ध होण्याची शक्‍यता कमी होती. त्यामुळे काळेवाडी फाटा परिसरातील खासगी रुग्णालय गाठले. सात दिवस उपचार घेतले. जवळपास सव्वातीन लाख रुपये खर्च आला. नातेवाइकांकडून थोडीफार मदत मिळाली. दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाला. आता प्रकृती बरी आहे. ही आहे, पिंपरीतील संत तुकारामनगरमधील 50 वर्षीय रुग्णाची कहाणी. पण, सर्वच सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडणारे नाहीत आणि महापालिकेच्या रुग्णालयात 'ऑक्‍सिजन' व 'व्हेंटिलेटर बेड' शिल्लक नाहीत, त्यामुळे रुग्णांची परवड होत आहे. प्रसंगी कोरोना जिवावर बेतत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महापालिकेचे संत तुकारामनगरमधील यशवंतराव चव्हाण (वायसीएम), पिंपरीतील जिजामाता आणि भोसरीतील नवीन रुग्णालयांसह कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या काटोकाट आहे. गंभीर रुग्णांची संख्या पाहता उपलब्ध बेड कमी पडण्याची शक्‍यता आहे. खासगी 33 रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध असले तरी तेथील उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नाहीत. त्यामुळे महापालिकेने बेड वाढविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदत करण्याची आवश्‍यकता आहे. सद्यःस्थितीत महापालिकेने तीन ठिकाणी एक हजार 425 बेडची 'जम्बो फॅसिलिटी' उभारणी सुरू केली आहे. 

सध्या तीन गोष्टींवर लक्ष : आयुक्त 

सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, महापालिका रुग्णालयांत व्हेंटिलेटर काटोकाट उपलब्ध आहेत. त्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. खासगी रुग्णालयांतील उपचार परवडत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बेड वाढविणे आवश्‍यक आहे. त्यामुळे वायसीएम, भोसरी व जिजातामा रुग्णालय मिळून अधिकचे 52 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होणार आहेत. सध्या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार प्रभाग स्तरावरील वॉररूमच्या माध्यमातून रुग्ण व रुग्णालयांवर लक्ष ठेवणे, व्हेंटिलेटर व ऑक्‍सिजन बेड वाढविणे आणि तीन ठिकाणी जम्बो फॅसिलिटी रुग्णालय उभारण्यावर भर दिला आहे, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दृष्टिक्षेपात रुग्ण 

 • स्वरूप संख्या 
 • लक्षणे नसलेली ः 3707 
 • लक्षणे असलेली ः 954 
 • गंभीर ः 114 
 • व्हेंटिलेटर ः 54  (शुक्रवारी दुपारी तीन पर्यंतची स्थिती) 

व्हेंटिलेटर बेड वाढविणार 

 • वायसीएम : 30 
 • भोसरी : 10 
 • जिजामाता : 12 

दृष्टिक्षेपात खासगी रुग्णालये 

 • एकूण बेड : 1633 
 • एकूण रुग्ण : 725 
 • बेड उपलब्ध : 783 
 • आयसीयू बेड उपलब्ध : 125 

खासगी रुग्णालयांतील खर्च 

 • रुग्णाचे वय : 50 वर्ष 
 • ऍडमिट : 7 दिवस 
 • त्रास : निमोनिया 60 टक्के, कोविड, घशात सूज 
 • उपचार : एक्‍स-रे, सीटी स्कॅन, ऑक्‍सिजन बेड 
 • औषधांचा एकूण खर्च : 70 हजार 
 • ऑक्‍सिजन बेड रोज सरासरी खर्च : 15 हजार 
 • ऑक्‍सिजन बेड सात दिवसांचा खर्च : 1 लाख 5 हजार 
 • रुग्णालयातील सुविधांचा खर्च : 1 लाख 38 हजार 
 • सात दिवसांचे एकूण बिल : 3 लाख 13 हजार 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 
 

loading image
go to top