धक्कादायक : 'ती' कोरोना पॉझिटिव्ह, तरी दुबईला गेली कशी?

धक्कादायक : 'ती' कोरोना पॉझिटिव्ह, तरी दुबईला गेली कशी?

पिंपरी : दुबईहून ती महिला पिंपरी चिंचवड शहरात आली. कारण, पुनावळ्यातील एका आलिशान सोसायटीत तिने फ्लॅट खरेदी केला होता. त्याची कागदोपत्री पुर्तता करायची होती. पण, कोरोनामुळे लॉकडाउन झाले. प्रवासासाठी वाहनांची चाके जागेवर थांबली. विमानांची उड्डाणे बंद झाली. त्यामुळे ती अडकून पडली. आता चार महिने होत आले होते. पण, तिला कोरोनाने ग्रासले. होम आयसोलेशनचा निर्णय तिने घेतला. सोसायटी पदाधिकाऱ्यांनीही सर्व सहकार्य केले. पण, दोन दिवसांपूर्वी ती पळून गेली. थेट शारजा गाठले आणि तेथून सोसायटी पदाधिकाऱ्यांना कळविले. ती गेली कशी? कोरोना निगेटिव्हचे सर्टिफिकेट मिळवले कसे आणि कुठून? विमानतळ अधिकाऱ्यांनी तिला अडवले कसे नाही? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. सोसायटी पदाधिकाऱ्यांनी पोलिस व महापालिका प्रशासनाकडे धाव घेतली आहे.

पुनावळेतील व्हीजन इंद्रमेघ सोसायटी. 152 सदनिका. दोन विंग. त्या महिलेने बी विंगमध्ये सदनिका घेतलेली. सदनिका खरेदीची पूर्तता करण्यासाठी ती दुबईहून पुनावळेत आली. पण, लॉकडाउनमुळे अडकून पडली. अकरा जुलैला थेरगाव येथील खासगी रुग्णालयात कोरोना तपासणी केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या बाबतची माहिती संबंधित रुग्णालयाने महापालिका प्रशासनाला 12 जुलैला दिली. महिलेने होम आयसोलेशनचा पर्याय निवडला. सोसायटी कंटेन्मेंट झोन जाहीर झाली. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही बाहेर पडायचे नाही. 152 कुटुंबे प्रतिबंधित क्षेत्रात आली. तेरा जुलै रोजी महापालिकेचे वैद्यकीय पथक आले. होम आयसोलेशनची कागदोपत्री पूर्तता केली. जबाबदारी म्हणून सोसायटीच्या अध्यक्षांनी स्वाक्षरी केली. सोसायटी कार्यालयातील एक कर्मचारी सेवेसाठी दिला. अन्य पदाधिकारीही महिलेची काळजी घेऊ लागले. 17 जुलैला ती घराबाहेर पडली. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर आली. सुरक्षारक्षकांना चुकीची माहिती दिली. 'मेडिकलवर जाऊन येते', असे सांगून बाहेर पडली. थोड्या वेळाने ती महिला घरात नसल्याचे आढळले. सोसायटीच्या प्रवेशद्वारावरील नोंद वहीत तिच्या नावाची नोंद नव्हती. सुरक्षारक्षकांसह सोसायटी पदाधिकाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. पण, व्यर्थ. आणि दुपारी चार वाजून सात मिनिटांनी सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या मोबाईवर मेसेज आला. 'मी शारजा येथे पोचले आहे. माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.' आणि पदाधिकाऱ्यांनी हिंजवडी पोलिस ठाणे गाठले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संबंधित महिला पॉझिटिव्ह असताना परदेशात पळून गेली आहे. असेच, पत्र त्यांनी महापालिका वैद्यकीय विभागालाही दिले आहे. सोसायटी अध्यक्ष आशिष बिरादार म्हणाले, ''ती महिला आम्हा सर्वांसह सरकार, पोलिस, महापालिका या सर्वांना फसवून पळून गेली आहे. पॉझिटिव्ह असताना तिला विमानाचे तिकीट कसे मिळाले. सोसायटी प्रवेशद्वारावरील नोंद वहीत तिने नाव, फ्लॅट नंबर, संपर्क क्रमांक चुकीचा दिला आहे. कारण, मात्र मेडिकलवर जाते, असे नमूद केले आहे. ती महिला गेली कशी?, निगेटिव्ह रिपोर्ट मिळवले कसे? हा आम्हा सोसायटी पदाधिकाऱ्यांपुढे पडलेला प्रश्न आहे. पोलिसांना कळवूनही उपयोग झाला नाही.''

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com