पिंपरी-चिंचवड : कुत्र्यांच्या विषयावरून महापालिका प्रशासनाला नगरसेवकांनी धरले धारेवर 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

'सकाळ'च्या वृत्ताची दखल; सर्वसाधारण सभेत गाजला विषय 

पिंपरी : शहरात भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. मॉर्निंग वॉकला जायची भीती वाटते. कासारवाडीत तरुणाचा बळी गेला. अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत?, याची माहिती सर्व पक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, "कुत्र्याच्या हल्ल्यामुळे कासारवाडीत तरुणाचा बळी गेला. भटक्‍या कुत्र्यांवर नियंत्रण कसे आणणार.'' हर्शल ढोरे म्हणाले, "दररोज किती कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते.'' उषा मुंडे म्हणाल्या, "कुत्री, डुकरे पालन करणाऱ्यांवर कारवाई करावी.'' प्रमोद कुटे म्हणाले, "दिवसा कुत्रे सापडत नाहीत, तर रात्री पकडावे.'' संदीप वाघेरे म्हणाले, "कुत्रे पकडण्यासाठी एजन्सी नियुक्त करा.'' आशा शेंडगे म्हणाल्या, "कासारवाडीतील कर्ता पुरुष गेला. त्याच्या आठ वर्षांच्या मुलाला काय उत्तर देणार. एकदा काही तरी निर्णय घ्या. मनेका गांधी यांच्याशी पत्रव्यवहार करा. पशुवैद्यकीय अधिकारी फोन उचलत नाहीत. त्यांच्यावर काय कारवाई करणार. निर्बीजीकरण केलेले असताना कुत्र्यांची संख्या वाढते कशी?'' त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे म्हणाले, "मी फोन घेत असतो.'' संगीता ताम्हाणे म्हणाल्या, "कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे.'' सचिन चिखले म्हणाले, "डुकरांचाही बंदोबस्त करा.'' राहुल कलाटे म्हणाले, "निर्बीजीकरण करणारी संस्था बदला.'' पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, "कुत्र्यांबाबत लोकांच्या मनात भीती आहे. कोंडवाडा करता येईल का?, याचा विचार करावा.'' 

प्रोसेडिंगमधून शब्द वगळा 
आपण कुत्रे पकडून अन्य ठिकाणी यापूर्वी सोडले आहेत. तसे कोणी आपल्याकडे सोडले आहेत का? याचा शोध घ्यावा, असे संदीप वाघेरे यांनी सांगितले. त्यावर राहुल जाधव यांनी आक्षेप घेतला व आपण कुत्रे पकडून अन्य भागात सोडले आहेत, हे वाक्‍य प्रोसेडिंगमधून वगळण्याची विनंती केली. त्यानुसार वाघेरे यांचे शब्द सभावृत्तांतून वगळण्याचा आदेश महापौर उषा ढोरे यांनी दिला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अतिरिक्त आयुक्त अजित पवार म्हणाले, "तमिळनाडूचे पथक सोमवारपासून (ता. 12) आले आहे. सोमवारी चाळीस व मंगळवारी (ता. 13) तीस डुकरे पकडली आहेत. परंतु, या पूर्वी त्यांच्यावर हल्ले झाले होते. त्यामुळे कर्नाटक सीमेपर्यंत बंदोबस्त द्यावा लागेल. कुत्र्यांबाबत बैठक झाली आहे. दीपा बजाज यांच्या संस्थेची मदत घेतली आहे. गेल्या साडेपाच महिन्यात साडेबारा हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. महिन्याला अडीच हजार निर्बीजीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. तीन महिन्यांत चांगला रिपोर्ट मिळेल. शहरात 80 हजार कुत्री आहेत.'' 

कुत्र्याचा जन्मदिवस साजरा 
सात वर्षांपूर्वी एक कुत्र्याचा मृत्यू झाला. त्याचा जन्मदिवस साजरा करण्याची परवानगी त्याच्या मालकाने मागितली होती. सुरुवातीला आम्ही दिली नाही. पण, त्यांनी खूप विनंती केल्यामुळे परवानगी दिली. त्यांनी कुत्रे दफन केलेल्या ठिकाणी मंडप घातला व साडेतीनशे लोकांना जेवू घातले. अशी व मानसिकता शहरातील कुत्रे प्रेमींची आहे. कुत्र्यांबाबत काय निर्णय घ्यायचा, याबाबत पुढील आठवड्यात आयुक्तांकडे प्रस्ताव ठेवणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corporators took pimpri chinchwad municipal administration to over the issue of dogs