esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाबत समुपदेशन; आतापर्यंत 15 हजारांवर नागरिकांचं शंकासमाधान
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाबत समुपदेशन; आतापर्यंत 15 हजारांवर नागरिकांचं शंकासमाधान
  • वायसीएमच्या माध्यमातून 15 हजार 565 व्यक्तींचे कोरोनाबाबत शंकासमाधान 

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाबत समुपदेशन; आतापर्यंत 15 हजारांवर नागरिकांचं शंकासमाधान

sakal_logo
By
पीतांबर लोहार

पिंपरी : 'मला सर्दी आहे. खोकला आहे. तापही थोडा वाटतोय. कोरोनाची टेस्ट करू का? कुठे करू? ती पॉझिटिव्ह आली तर कुठे उपचार घेऊ?', 'कोविड केअर सेंटर कुठे आहे?', 'आमचं पेशंट सिरीयस आहे, आयसीयू बेड खाली आहे का?', 'मी घरातच थांबून उपचार घेऊ शकतो का?', 'आमचा पेशंट कसा आहे? त्यांच्या तब्बेतीविषयी माहिती मिळेल का?'... अशा शंकाचे निरसन आणि रुग्ण व नातेवाइकांचे समुपदेशन महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले जात आहे. गेल्या सहा महिन्यात 15 हजार 565 व्यक्तींचे समुपदेशन केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

समुपदेशन केंद्रामार्फत प्रत्यक्ष व फोनद्वारे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन केले जात आहे. यासाठी पाच वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे. अंत्यसंस्कार कुठे करावे, काय काळजी घ्यावी, नातेवाइकांची मानसिकता तयार करणे, नातेवाईक व डॉक्‍टर यांच्यात समन्वय साधणे, गंभीर रुग्णांसाठी प्लाझ्मा दाता मिळविणे, डॉक्‍टरांशी बोलून रुग्णाची माहिती नातेवाइकांना देणे असे त्यांच्या कामकाजाचे स्वरूप आहे. यासाठी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते (एमएसडब्ल्यू) महादेव बोत्रे, कुंडलिक आमले, प्रकाश झुंकटवार, किशन गायकवाड, रवीचंद्र ढवळे, लता सुवर्णकार कार्यरत आहेत. मनोचिकित्सक डॉ. मंजित संत्रे केंद्रप्रमुख आहेत. अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे काम सुरू आहे. 

रुग्णांचे नातेवाईक म्हणतात... 

माझ्या बहिणीचे वय 58 वर्षे. श्‍वास घ्यायला त्रास व्हायचा. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह. तिचे वजन 95 किलो. उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास. त्रासामुळे ती खचून गेली होती. मला इथे राहायची नाही म्हणायची. आम्ही अपेक्षा सोडून दिली होती. पण, समुपदेशामुळे तिला धीर मिळाला आणि तीन आठवड्यांच्या उपचारानंतर तिला डिस्चार्ज मिळाला. आता साडेतीन महिने झालेत. बहीण ठणठणीत आहे. डॉक्‍टरांचे प्रयत्न आणि समुपदेशनाने वाढलेली बहिणीची इच्छाशक्ती यामुळेच हे शक्‍य झाले, अशी भावना येरवडा येथील महिला रुग्णाच्या भावाने (रा. तळेगाव दाभाडे) व्यक्त केली. 

कामकाजाचे स्वरूप 

- प्रत्यक्ष व फोनद्वारे रुग्ण व नातेवाइकांचे समुपदेशन, मार्गदर्शन 
- रुग्णाच्या नातेवाइकांना भावनिक आधार देणे, प्रश्‍न सोडविणे 
- डिस्चार्ज रुग्णांना ऍम्बुलन्स उपलब्ध करून देणे 
- डीवाय पाटील रुग्णालयासंदर्भीय रुग्णांच्या उपचारात समन्वय 

दृष्टिक्षेपात समुपदेशन 

  • प्रत्यक्ष : 8000 
  • फोनद्वारे : 7565 
  • एकूण : 15565 

समुपदेशन हेल्पलाइन 

  • कुठे : वायसीएम हॉस्पिटल, पिंपरी 
  • केव्हा : सकाळी 9 ते संध्याकाळी 7 
  • कधी : आठवड्याचे सातही दिवस 
  • कसे : 020-67332297 व प्रत्यक्ष