esakal | देखाव्यांचा व्यवसाय उरला यंदा केवळ 'दिखावा' 
sakal

बोलून बातमी शोधा

देखाव्यांचा व्यवसाय उरला यंदा केवळ 'दिखावा' 

मूर्तीकारांच्या व्यवसायचक्रावर संक्रांत; दीड ते दोन हजार मूर्ती धूळखात पडून 

देखाव्यांचा व्यवसाय उरला यंदा केवळ 'दिखावा' 

sakal_logo
By
सुवर्णा नवले

पिंपरी : पिंपळे- गुरवमध्ये राहणारे रमण कारंडे कुटुंबीय. गेल्या वीस वर्षांपासून कला क्षेत्रात योगदान. गणेश मंडळांना हलत्या देखाव्यासाठी मागणीप्रमाणे भाडेतत्त्वावर ऑर्डर पुरविणे त्यांचे काम. मात्र, या व्यवसायातून या कुटुंबाप्रमाणेच अनेकांना सेवानिवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. गणेशोत्सवासारख्या सणावरच संक्रांत आल्याने तब्बल दीड ते दोन हजार मूर्ती धूळखात पडून आहेत. या व्यवसायात मूर्तीला लागणारे कपडे, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, लोखंड लाकडासह विविध साहित्याचा पुरवठा करणारे चक्र पूर्णपणे कोलमडले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गणेशोत्सवापूर्वी चार महिने आधीपासूनच ऑर्डर घेऊन देखाव्यांच्या मागणीनुसार सेटअप तयार करून देण्याचे त्यांचे काम. काही जण थेट देखावे विकतही घेत. मात्र, गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याने यावर्षी या देखाव्यांतून राबणाऱ्या कामगारांच्या हाताला कामच उरले नाही. एक रुपयांचे अर्थचक्रही फिरले नाही. काम करणारे मजूर परगावी गेले आहेत. जे उरले ते इतर कामाच्या शोधात आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, नाशिक आदी भागातून मूर्ती कारागिरांना देखाव्यांच्या ऑर्डर मिळतात. कारंडे यांच्याकडे वीस मजूर पूर्वी काम करीत होते. सध्या चार मजूर उरले आहेत. सर्वांना दहा ते बारा हजार रुपये महिना यातून उत्पन्न मिळत असे. पाच फुटांपासून ते पंधरा फुटांपर्यंत मूर्ती कारखान्यात बनत. या मूर्तींसाठी ऍक्‍सल, पीओपी, खाचे, विविध रंग, वेशभूषा साहित्य, रंगबिरंगी पोशाखाचा खर्च येत असे. रामायण, महाभारत, पेशवेकालीन, पौराणिक या ऐतिहासिक देखाव्यांसह सामाजिक व सांस्कृतिक समाजप्रबोधनपर देखाव्यांना मागणी असे. पिंपरी, सांगवी, काळेवाडी, चिंचवड, निगडी, भोसरी या भागात देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी लोटत असे. 

जिवंत देखाव्यांचे व्यासपीठ हिरावले 

जिवंत देखाव्यातून अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळत असे. पर्यावरण, प्लॅस्टिक बंदी, स्त्री अत्याचार, बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्येसारखे आदी विषयांवर देखावे सादर होत असत. एकांकिका किंवा पथनाट्यातून जनजागृती ऑर्डर घेत. मात्र, त्यावरही निर्बंध आले. बऱ्याच मंडळांची रौप्य, सुवर्ण वर्ष धूमधडाक्‍यात साजरी होऊन मोठी देणगी जमा होत असे. मनोरंजनाच्या कार्यक्रमांवरच सर्वाधिक खर्च मंडळाचा होत असे. मात्र, कोरोनाने एकमेकांवर अवलंबून असलेले प्रत्येक घटक हतबल झाला आहे. 

पिंपरी-चिंचवड पुन्हा रेडझोनमध्ये जाण्यामागची कारणं काय? जाणून घ्या

  • हलते व जिवंत देखावे मूर्ती कारागीर अंदाजे : 15 ते 17 
  • पुणे व पिंपरी-चिंचवड शिल्प कारागीर: 1200 
  • दरवर्षी मंडळाच्या ऑर्डर : 180 ते 250 
  • एका मूर्तीतून भाडे उत्पन्न: 4 ते 5 हजार 

दरवर्षी मंडळांचे बुकिंग असते. बरेच जण भाडेतत्त्वावर मूर्तींची ऑर्डर घेतात. देखाव्याला चार ते पाच हजार भाडे असते. स्वाईन प्लूच्या वेळीही व्यवसायावर गंडांतर आले होते. मात्र, त्यावेळी मूर्ती बनवून तयार केल्या होत्या. या वेळी उत्सवाला परवानगी नसल्याचे माहीत होते. त्यामुळे गुंतवणूक केली नाही. मात्र, कार्यक्रमांवर निर्बंध न घालता नियम शिथिल करायला हवे होते. ध्वनिप्रदूषण व वेळेचे निर्बंध कडक हवे होते. लाखो रुपयांची उलाढाल असली तरी यात राबणारे हात अनेक हात बेघर झाले आहेत. 
- रमण कारंडे, पिंपळे गुरव, मूर्ती शिल्पकार 

गणेश मंडळाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. दरवर्षी आम्ही पौराणिक, ऐतिहासिक जिवंत व हलते देखावे सादर करतो. जवळपास दोन ते तीन लाख रुपये मंडपासहित, कलाकार व पूर्ण डेकोरेशन सेटअपला खर्च येतो. 
- दत्तात्रेय पवळे, जय बजरंग तरुण मंडळ, निगडी गावठाण