'रेमडेसिव्हिर'ची जादा दराने विक्री करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

कोरोनावरील उपचारासाठी अत्यावश्यक असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची बेकायदेशीररित्या जादा दराने विक्री केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. 

पिंपरी : कोरोनावरील उपचारासाठी अत्यावश्यक असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची बेकायदेशीररित्या जादा दराने विक्री केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. शाहिद जब्बार शेख (वय 34), विजय बबन रांजणे (वय 35), वैष्णवी राजेंद्र टाकोरकर (वय 30, तिघेही रा. ओटास्कीम, निगडी) अशी आरोपींची नावे आहेत. मुस्तफा अब्दुलगफार तांबोळी (वय 19, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फिर्यादीच्या आईला कोरोनाची लागण झाल्याने त्यांना 23 ऑगस्टला आकुर्डीतील स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कोरोनावरील उपचारासाठी अत्यावश्यक असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नव्हते. स्टार हॉस्पिटलमध्ये नोकरीस असलेल्या आरोपी शाहिद याने बेकायदेशीररित्या औषध विक्रीचा कोणताही परवाना नसताना फिर्यादीला जादा दराने इंजेक्शनची विक्री केली. पाच हजार 400 रुपयाला एक इंजेक्शन असताना फिर्यादीकडून दोन इंजेक्शनचे 15 हजार 500 रुपये घेतले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

फिर्यादीच्या वडिलांना देखील कोरोनाची लागण झाल्याने त्यांनाही स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांना इंजेक्शनची गरज असल्याने शाहिदचे इतर दोन साथीदार रांजणे व टाकोरकर यांनी 22 सप्टेंबरला फिर्यादीच्या वडिलांच्या उपचारासाठी जादा दराने एका इंजेक्शनची सहा हजार रुपयांना विक्री केली. याबाबत फिर्यादीने निगडी पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. त्यावर चौकशी केल्यानंतर निगडी पोलिसांनी बुधवारी (ता. 23) सायंकाळी तिघांवर जीवनावश्यक वस्तू कायदा, औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, स्टार हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित वाघ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून, हा प्रकार हॉस्पिटलमध्ये घडला नसल्याचे म्हटले आहे. तसेच, संबंधित वॉर्डबॉय आणि सुरक्षारक्षक महिलेला कामावरून काढून टाकले आहे. पोलिसांनी चौकशी करावी आणि या घटनेत दोषी असलेल्यांवर कारवाई करावी. या घटनेशी हॉस्पिटल आणि फार्मसीचा काहीही संबंध नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime against three persons selling remedivisir injection in exorbitant rates in pimpri chinchwad