Crime News : पिंपरी-चिंचवडमधील दिवसभराचे क्राईम अपडेट्स

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 December 2020

  • निगडीत भंगार व्यावसायिकाला गोळ्या घालून जिवे मारण्याचा प्रयत्न 
  • चार लग्न करून फसवणूक 
  • निगडीतील आगीत एकाचा मृत्यू 

निगडीत भंगार व्यावसायिकाला गोळ्या घालून जिवे मारण्याचा प्रयत्न 

पिंपरी : भंगार व्यावसायिकाच्या भावासोबत झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून भंगार व्यावसायिकाला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. दोन पिस्तूलमधून भंगार व्यावसायिक आणि त्याच्या मित्राच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. ही घटना निगडीतील सेक्तर 22 येथील बिल्डिंग क्रमांक सातच्या समोर घडली. सूरज पवार (वय 28), राहुल सोनकांबळे (वय 28, रा. निगडी) या आरोपींना अटक केली असून, प्रशांत कोळी (वय 32) फरारी आहे. या बाबत भरत ज्ञानोबा थोरात (वय 28, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी भंगारचा व्यवसाय करतात. त्यांच्या भावासोबत आरोपींचे शिवीगाळ करण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. आरोपी एका मोटारीतून आले. त्यावेळी फिर्यादी बिल्डिंग क्रमांक सातच्या समोर त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. आरोपी तिथे आले आणि फिर्यादी व त्यांचा मित्र रफिक यांना म्हणाले "तुम्हाला गोळ्या घालतो'. त्यानंतर आरोपी प्रशांत कोळी आणि सूरज पवार यांनी त्यांच्या हातातील पिस्तुलातून फिर्यादी आणि त्यांचा मित्र रफिक यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. आरोपींनी गोळीबार करीत परिसरात दहशत निर्माण केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

चार लग्न करून फसवणूक 

पहिल्या बायकोचे निधन झाल्याचे खोटे सांगून दुसरे लग्न केले. त्यानंतर दुसऱ्या बायकोच्या परस्पर तिसरे आणि चौथेही लग्न केले. यातील एका पत्नीने चार लग्न करणाऱ्या पतीविरोधात तक्रार दिली. फसवणूक झालेल्या महिलांमध्ये एका पोलिस महिलेचाही समावेश आहे. चऱ्होली बुद्रूक येथील साठ वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्याच्या दुसऱ्या पत्नीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2013 ते 20 डिसेंबर 2020 या कालावधीत घडला. आरोपीने त्याची पहिली पत्नी मयत झाली आहे, असे खोटे सांगून फिर्यादी महिलेसोबत 2014 मध्ये लग्न केले. त्यानंतर त्याने आणखी दोन महिलांसोबत लग्न केले. त्यामध्ये एका पोलिस महिलेचा देखील समावेश आहे. फिर्यादी महिलेच्या परस्पर लग्न करून तिची फसवणूक केली. लग्नाच्या अगोदर आणि लग्नानंतर फिर्यादी महिलेचा क्रूरतेने लैंगिक छळ केला. फिर्यादीला आरोपीने मारून टाकण्याची धमकी दिली. हा त्रास वाढत गेल्याने तिने पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निगडीतील आगीत एकाचा मृत्यू 

कॉम्प्युटर दुरुस्तीच्या दुकानाला लागलेल्या आगीत दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाला. ही निगडीतील यमुनानगर येथील एलआयसी बिल्डिंगजवळ घडली. अंकित अगरवाल (वय 27, रा. यमुनानगर, निगडी. मूळ रा. नेपाळ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. यमुनानगर येथे एलआयसी बिल्डिंगजवळ व्हीजन कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क या दुकानाला सोमवारी (ता. 21) सकाळी आग लागली. याची माहिती सकाळी साडेसात वाजता अग्निशमन केंद्राला मिळाली. मुख्य अग्निशमन केंद्र आणि प्राधिकरण उपविभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 
या आगीच्या घटनेमध्ये एका कामगार तरुणाचा मृत्यू झाला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मृत तरुण दुकानात काम करून दुकानातच राहत होता. दुकानाच्या पोटमाळ्यावर ही आग लागली असून, त्यात त्या कामगाराचा मृत्यू झाला. रविवारी रात्री झोपताना त्याने आतून लॉक लावून घेतले होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी शटर उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी अंकित मृतावस्थेत पडल्याचे दिसले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime news updates in pimpri chinchwad city