गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

मारहाण प्रकरणी
दोघांना अटक
पिंपरी : पत्र्यावर दगड मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना नेरे, दत्तवाडी येथे घडली. गणेश भीमराव वायकर (रा. नेरे, दत्तवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तय्यूब बाबू शेख (वय ३५), बाबू मेहबूब शेख (वय ६०, दोघेही रा. नेरे, दत्तवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादीचा वाढदिवस असल्याने फिर्यादीचे घरी त्यांचे दाजी रवी जाधव, मामा सचिन कुंभार, मित्र कृष्णा मोरे हे जेवण करीत होते. दरम्यान, घराच्या पत्र्यावर कोणीतरी दगड फेकत असल्याने सर्वांनी बाहेर जाऊन पाहिले असता आरोपी तय्यूब हा दगड मारून घरी पळून गेला. त्यास दगड का मारत आहेस, याबाबत विचारपूस करण्यासाठी त्याच्या घरी गेले असता तय्यूब याने बाहेर येऊन फिर्यादीस शिवीगाळ करून गजाने डोक्यात मारहाण केली. फिर्यादीचे मामा त्यास धरण्यास गेले असता त्यांच्याही डोक्यात गज मारून जखमी केले. कृष्णा मोरे यांना बाबू शेख याने पाईपने मारहाण केली.
------------------
भांडण सोडविण्यासाठी
गेलेल्या तरुणाला मारहाण
पिंपरी : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपळे गुरव येथे घडला. याप्रकरणी अनुप अजय सिंग (रा. शास्त्रीनगरजवळ, कासारवाडी, भोसरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ऍलेक्स, कृष्णा व त्यांचे दोन मित्र यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी त्यांची गाडी धुण्यासाठी वॉशिंग सेंटरला उभी करून बसले असताना आरोपी व त्यांचे मित्र आले. साक्षीदार सोहेल शेख याने त्यांच्याकडे उधारीचे पैसे मागितले. त्यांनी सोहेल यांना शिवीगाळ करून मारहाण केली. दरम्यान, फिर्यादी हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपी ॲलेक्स याने फिर्यादीला शिवीगाळ करून काठीने मारहाण केली.
-----------------------
भरधाव दुचाकीच्या धडकेत
वृद्धाचा मृत्यू
काळेवाडी : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना काळेवाडी येथे घडली. रघुनाथ बाबूराव पंडित (वय ७५, रा. मोरया कॉलनी, नढे कॉर्नर, विजयनगर, काळेवाडी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धांचे नाव आहे. याप्रकरणी रवींद्र मुरलीधर सुतार (रा. गांगर्डेनगर, पिंपळे गुरव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अब्दुल रहीम खान (वय २२, रा. पवनानगर, काळेवाडी) या दुचाकीचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. पंडित हे एम्पायर इस्टेटकडून एमएम चौकाकडे येणाऱ्या रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून भरधाव आलेल्या आरोपीने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
-------------------
एसटी प्रवासात दोन लाखांचे दागिने लंपास
पिंपरी : एसटी प्रवासात प्रवाशाची बॅग कापून त्यातील दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले.
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या त्यांच्या पतीसह मलकापूर ते वल्लभनगर असे एसटीने प्रवास करीत होते. त्यांनी लेदरची बॅग सीटखाली ठेवली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी साहाय्याने बॅग कापून त्यातील दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com