पिंपरी-चिंचवडकरांमध्ये सायकलिंगचा ट्रेंड वाढतोय 

सुवर्णा नवले
Tuesday, 8 December 2020

  • बच्चे कंपनीसह ज्येष्ठ व महिलाही सकाळी होताहेत सहभागी 

पिंपरी : कोविड काळात व त्यानंतरही युवकांसह आयटीयन्स, डॉक्‍टर व विविध क्षेत्रातील मंडळींनी सायकलिंग व्यायामाला पसंती दिली आहे. गुलाबी थंडीतही हा व्यायामाचा फंडा सर्वांनाच आवडू लागला आहे. बच्चे कंपनीसह ज्येष्ठ व महिलाही सकाळच्या वेळेत एका रांगेत शिस्तबद्धपणे सायकल चालवितानाचे दृश्‍य शहरात नजरेस पडत आहे. परिणामी, सायकल व्यायामाचा ट्रेंड अधिक वाढला असून, शहरात पुन्हा सायकल रुजल्याचे दिसून येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सायकलिंगची आवड आहे. दर शनिवारी किंवा रविवारी सुटीच्या दिवशी आयुक्त हेल्मेटसह योग्य ती काळजी घेऊन सायकलवरून व्यायाम करताना दिसतात. नुकतीच त्यांनी 62 किलोमीटरची सायकल राइड तीन तासांत पूर्ण केली. त्याचे फोटो सोशल मीडियावरही अपडेट केले आहेत. यामुळे तरुणांचा उत्साह अधिक वाढला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बऱ्याच जणांच्या सायकल गिअर व नॉनगिअरच्या आहेत. काही जण मोटार बाईकही घेत आहेत. बरेच आयटीयन्स न चुकता दर शनिवारी व रविवारीही सायकलस्वारी करीत आहेत. शहरातील इंडो ऍथलेटिक हा ग्रुपही सायकलिंगचे विविध उपक्रम राबवितो. तरुणांना सायकल व्यायामासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. शिवाय दर आठवड्याला राईड व नियोजनबद्ध व्यायाम पद्धतीमुळे सायकिंलगचे ग्रुपही शहरात झपाट्याने वाढले आहेत. परिणामी, व्यायाम हे आता तरुणांचे रुटिन झाले आहे. वजन कमी करण्याची धडपड, कॅलरीज काऊंटिंगच्या माध्यमातून स्वतः:ची ऊर्जा वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरुणांनी सायकलिंगसाठी हातात हेल्थ बॅण्ड वॉचही खरेदी केले आहेत. ज्यामुळे प्रत्येकाचे किलोमीटर व बर्न कॅलरी त्वरित समजण्यास मदत होत आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंडो ऍथलेटिक सायकलिंग ग्रुपचे सदस्य गणेश भुजबळ म्हणाले, "पाच वर्षांपासून मी सायकलिंग व रनिंग करतो. आधी ट्रेकिंग करीत असे. पूर्णानगर येथून व्यायामाला सुरुवात करतो. आठवड्यातून एक दिवस जसा वेळ मिळेल तसा सायकल चालवतो. केवळ आहारात गोड पदार्थ कमी केले आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत झाली आहे. सर्वांच्या बरोबरीने सायकल चालविण्यास हुरूप येतो. बाकी कोणतीही पथ्ये मी पाळत नाही. डाएट वगैरे करत नाही.'' 

निगडी व आकुर्डी येथेच केवळ सुसज्ज सायकल ट्रॅक आहेत. मात्र, पिंपरी व चिंचवड भागातील ट्रॅक नामशेष झाले आहेत. यासाठी सुसज्ज व चांगल्या दर्जाचे सायकल ट्रॅक असण्याची अपेक्षा सायकलिंग ग्रुपने व्यक्त केली आहे. ज्यामुळे अपघातापासून संरक्षण होण्यास मदत होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cycling trend increasing in pimpri chinchwad city