Accident : ‘ओव्हरटेक’चा नाद जिवावर; द्रुतगती मार्गावर अपघातांची संख्या वाढली

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
overtaking accident
overtaking accidentsakal
Updated on

- राहुल हातोले

पिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ मधील अपघातांचे आकडे पाहता, यामध्ये सरासरी १४ टक्के वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे.

यामध्ये ‘ओव्हरटेक’च्या नादात वर्षभरात तब्बल ६३ जणांचे मृत्यू झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण काहीसे कमी असले, तरी ही संख्या आणखी कमी होणे आवश्यक आहे.

द्रुतगती मार्गावर सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) खोपोली ते खंडाळा या घाट विभागात ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हाती घेतला आहे. तो काही महिन्यांतच पूर्ण होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांवर नियंत्रण येण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, जुलै-२०२४ मध्ये या मार्गावर आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीअंतर्गत ‘एआय कॅमेरा’ बसविण्यात आले आहेत. मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील काही जण बेशिस्तपणे वाहन चालवत असल्याने अपघातांमध्ये वाढ होत असल्याचे प्रशासकीय आकडेवारीतून समोर येत आहे.

या द्रुतगती मार्गावर २०२३ या वर्षभरात १५१ अपघात झाले, तर २०२४ मध्ये ही संख्या १७२ वर गेली आहे. त्यामुळे जनजागृती मोहीम आणखी व्यापकपणे राबवून अपघातांची संख्या कमी करण्याचे आव्हान परिवहन विभाग, महामार्ग पोलिस प्रशासनासमोर आहे.

अपघाताची कारणे

  • अतिवेगात वाहन चालविणे

  • सीटबेल्टचा वापर न करणे

  • लेन कटिंग (अचानक दुसऱ्या रांगेत प्रवेश)

  • ‘नो पार्किंग’च्या ठिकाणी वाहन थांबविणे

  • विरुद्ध दिशेने वाहन चालविणे

  • चुकीच्या दिशेने मार्गावर येणे किंवा बाहेर पडणे

  • परवानगी नसतानाही दुचाकी चालविणे

  • वाहन मागे घेणे (रिव्हर्स)

  • वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे

नियमांचे पालन आवश्यकच...

‘वाहन वेगात चालविल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघातांमध्ये वाढ होत आहे. बरेच वाहनचालक नियम न पाळता ओव्हरटेक करतात. यामुळेही अपघातांना निमंत्रण मिळत आहे. अयोग्य ठिकाणी वाहने पार्क केल्यानेही अपघात वाढत असल्याचे निरीक्षण यंत्रणेने नोंदवले आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे,’ असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.

द्रुतगती मार्गावर ‘आरटीओ’चे पथक चोवीस तास तैनात असते. जनजागृतीसह बेशिस्तांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जाते. समुपदेशन केंद्रदेखील सुरू केले आहे. वाहनचालकांनी आपल्या कुटुंबीयांचा आणि आपल्या जबाबदारीचा विचार करून सावकाश, शिस्तीत वाहन चालविणे आवश्यक आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून आम्हाला सहकार्य करावे.

- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिहवन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com