कर्जत विश्लेषण

कर्जत विश्लेषण

कर्जत

शिवसेनेला आत्मचिंतनाची गरज

देशाच्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत बहुचर्चित मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हॅटट्रिक साधली आहे. मात्र, मागच्या दोन निवडणुकांच्या तुलनेत बारणे यांचे मताधिक्य कमी झाले आहे. दुसरीकडे कर्जत विधानसभा मतदारसंघात बारणे यंदा १७ हजार मतांनी पिछाडीवर राहिले. मतदारांमधील नाराजी, मुस्लिम समाजाचा विरोध, तर शिवसेना ठाकरे गटाला असलेल्या सहानुभूतीची लाट या कारणांमुळे बारणे यांना फटका बसला. मात्र, तरीही अन्य मतदारसंघात मिळालेल्या आघाडीमुळे बारणे तरले आहेत.
- दीपक पाटील

क र्जत विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. येथे शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. २००९ व २०१४ या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत निर्माण झालेल्या बंडखोरीमुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला होता. मात्र, २०१९ मध्ये शिवसेनेने बंडखोरी रोखत शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी तटबंदी उभी करीत या मतदारसंघावर भगवा फडकावला. तर मावळ हा लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून यावर आजवर शिवसेनेचा भगवा कायम आहे. २००९ मध्ये शिवसेनेचे गजानन बाबर तर २०१४ पासून श्रीरंग बारणे या मतदारसंघात खासदार म्हणून आहेत. २०१९ ची निवडणूक ही शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणेविरुद्ध राष्ट्रवादीचे पार्थ पवार अशी होती. यामध्ये बारणे यांना विजयाची खात्री होती. त्यानुसार तब्बल दोन लाख १५ हजारांच्या मताधिक्क्याने बारणे निवडून देखील आले. तर कर्जत विधानसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना १८५० मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे बारणे या मतदारसंघात पिछाडीवर राहिले. या वेळी या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड होते. तर यंदा या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदारसंघ पिंजून काढला होता. कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. दुसरीकडे भाजपदेखील झटून कामाला लागला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांनीदेखील ताकद लावली असल्याचे निकालावरून स्पष्ट होते.
खासदार श्रीरंग बारणे यांचा कर्जतमध्ये गेली पाच वर्षे संपर्क कमी होता. मतदारांना अपेक्षित असलेली कामे होताना दिसत नव्हती. त्यामध्ये कोरोना काळात बंद झालेले रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करणे, प्रवासी संघटनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष, नेरळ माथेरान मिनी ट्रेनच्या फेऱ्या वाढविणे, माथेरान ते अमन लॉज या शटल सेवा सुरू करणे, भागुचीवाडी येथील रस्ता पूर्ण करणे, या कामांचा समावेश आहे. यामुळे बारणे यांच्याविरोधात नाराजी होती. या वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटून दोन पक्ष झाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष यांना मोठी सहानुभूती होती. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे नवखे होते, मात्र, त्यांना या सहानुभूतीच्या फॅक्टरचा फायदा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मुस्लिम मतदार होते. त्यामुळे ते महाविकास आघाडीकडे आपोआपच वळले. तालुक्यातील मुस्लीम बहुल गावात एकहाती वाघेरे यांना मतदान झाले आहे. यामुळे तालुक्यात श्रीरंग बारणे हे पिछाडीवर गेले.

मित्रपक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार?
मतदारसंघात मतदान झाल्यानंतर बारणे यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने काम न केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी दुखावली गेली. पक्षाच्या कर्जत येथील जनसंपर्क कार्यालयातील बैठकीत स्थानिक नेते सुधाकर घारे यांनी आगामी विधानसभा स्वतंत्रपणे लढण्याचे जाहीर केले आहे. भाजपनेदेखील तयारी केली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम थेट महायुतीवर होणार आहे. त्याचे कारण कर्जतमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व मित्रपक्षांनी मेहनत घेतल्याचे निवडणुकीच्या निकालात बूथ यादीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे महायुतीला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कारण कर्जत मतदारसंघात महायुतीचे घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com