तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sant Tukaram Maharaj

जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा रविवारी (ता. २०) आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूत दाखल होत आहेत.

तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज

देहू - जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा (Tukaram Bij Sohala) रविवारी (ता. २०) आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक (Passionate) देहूत (Dehu) दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायत प्रशासनाची भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी लगबग सुरु आहे. या सोहळ्यासाठी देहूत विविध भागातून दिंड्या दाखल झालेल्या आहेत. इंद्रायणीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे.

संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांनी सांगितले, की संस्थानने मुख्य देऊळवाडा, वैकुंठस्थान येथील मंदिराची विद्युत रोषणाई, रंगरंगोटी केली आहे. मंदिरालगतच्या परिसराची जादा कर्मचारी नेमून स्वच्छता करण्यात आली आहे. मुख्य देऊळवाड्यात ३० सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, वैकुंठस्थान मंदिर परिसरातही कॅमेरे बसविले आहे. रविवारी पहाटे बीज सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. देहू नगरपंचायतीच्यावतीने गाव, नदीचा घाट परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.

तसेच माळवाडी, देहू, विठ्ठलवाडी, गाथा मंदिर परिसरात औषधफवारणी करण्यात आली आहे. भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी २४ तास पाणी व्यवस्था आणि १० टॅंकर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. देऊळवाडा आणि वैकुंठस्थान परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पीएमपीएलच्या बस गाड्यांसाठी गावाबाहेरच वाहनतळ करण्यात आलेला आहे. महावितरणकडून २४ तास वीजपुरवठा करण्यात आलेला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खास पथक तैनात करण्यात आलेले आहे. सध्या सुरु असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चोवीस तास वैद्यकीय सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच कोरोनाच्या चाचणीसाठी दहा हजार अॅन्टीजेन किट्स उपलब्ध आहेत. पुरेसा औषध साठा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. देहूरोड पोलिस ठाण्याकडून गावाबाहेर वाहनतळ उभारण्यात आला आहे. बीज सोहळ्यासाठी ७ पोलिस अधिकारी, १३० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

असा असेल सोहळा

  • रविवारी पहाटे तीन वाजता - मुख्य देऊळवाड्यात काकडआरती.

  • पहाटे ४ - श्री पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा संस्थानचे विश्वस्त, अध्यक्ष मंडळ, वंशज, वारकरी यांच्या हस्ते.

  • पहाटे ४.३० - विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा.

  • पहाटे ६ - वैकुंठ स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा.

  • सकाळी १० वाजता - पालखी प्रस्थान वैकुंठस्थान मंदिराकडे.

  • सकाळी १० ते दुपारी १२ - वैकुंठ सोहळा कीर्तन.

  • दुपारी १२.३० - वैकुंठस्थान येथून पालखीचे मुख्य देऊळवाड्यातील मंदिराकडे आगमन.

  • रात्री पारंपरिक फड आणि दिंड्या यांचे कीर्तन कार्यक्रम.