पिंपरी - चिखली येथील कुदळवाडी भागात ९६ एकर भूभागावर असलेली सुमारे ४१ लाख चौरस फूट क्षेत्रफळावरील ८०६ अनधिकृत बांधकामे पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलिस आयुक्तालय यांच्या संयुक्त कारवाईत मंगळवारी (ता.११) पाडण्यात आली. सलग चार दिवसांपासून ही कारवाई सुरू असून आतापर्यंत १६१ लाख चौरस फूट क्षेत्रफळावरील २ हजार ३१७ बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत.
शहरातील नियोजित विकास आरक्षणे आणि नागरिकांच्या सुविधांसाठी असलेल्या आरक्षित जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि धडक कारवाई पथकांमार्फत कुदळवाडी येथे शनिवार (ता.८) पासून अनधिकृत बांधकामे हटविली जात आहेत.
या कारवाईमध्ये प्रामुख्याने अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई सुरू आहे.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे यांच्यासह अन्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता कारवाईत सहभागी झाले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या आधिपत्याखाली पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, संदीप डोईफोडे, विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये आज अखेरपर्यंत सुमारे १६१ लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या एकूण २ हजार ३१७ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहे. तसेच सुमारे ३७२ एकर भूभागावर ही कारवाई करण्यात आली असून यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे.
सहभागी यंत्रणा...
अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील चार कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलिस आणि मजूर, कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झाले. १६ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटर यांचा वापर कारवाईमध्ये करण्यात आला. याशिवाय ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका देखील येथे तैनात करण्यात आल्या आहेत. महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी देखील या कारवाईमध्ये सहभागी झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.