esakal | पिंपरी चिंचवड शहरात 'कोरोना'सह डेंगी - थंडीतापाचीही भीती
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue And Chikungunya Patients

पिंपरी चिंचवड शहरात 'कोरोना'सह डेंगी - थंडीतापाचीही भीती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या १६ महिन्यांपासून महापालिका प्रशासनासह वैद्यकीय व आरोग्य विभागाचा कोरोना विरुद्ध लढा सुरू आहे. नागरिकांमध्येही त्याविषयीच बोलले जात आहे. अन्य साथ आजार फारसे चर्चेतही नव्हते. मात्र, तीन दिवसांपूर्वी थेरगाव (Thergav) येथील नगरसेविका अर्चना बारणे (corporator archana barne) यांचे डेंगीमुळे निधन झाल्याचे त्यांच्यावर उपचार केलेल्या खासगी रुग्णालयाने कळविले आणि सर्व यंत्रणा जागी झाली. कोरोनासह अन्य साथरोगांविरुद्धही लढा सुरू झाला. (Dengue Corona in Pimpri Chinchwad Fear cold)

दरम्यान, बारणे यांचे निधन डेंगीमुळे झाले नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. तरीही साथरोगांविरुद्ध उपाययोजना सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. थेरगाव परिसर दाट लोकवस्तीचा आहे. अनेक चाळी आहेत. त्यामुळे अनेक जण पाणी साठवून ठेवतात. अशीत स्थिती शहरातील दाट लोक वस्ती व झोपडपट्ट्यांमध्येही आहे. कोरोनाचा सर्वाधिक उद्रेकही अशाच दाट लोकवस्तीच्या भागात झाला होता.

त्यामुळे प्रशासनाने अशा वस्त्यांमध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे. घरोघरी जाऊन आरोग्य विभागाचे कर्मचारी तपासणी करीत आहेत. डेंगी, चिकुनगुनिया, थंडीताप व दूषित पाण्यामुळे होणारे गॅस्ट्रो, कावीळ, टायफाइड, असे आजार होऊ नयेत, यासाठीही उपाययोजना केली जात आहे.

दृष्टिक्षेपात वर्षनिहाय रुग्ण

आजार २०१९ २०२०

डासांमुळे होणारे

 • थंडीताप २५ १०

 • डेंगी ५६६ २९५

दूषित पाण्यामुळे होणारे

 • गॅस्ट्रो १२२ ४०

 • कावीळ ३६ ३९

 • टायफाइड २०८ १४२

दूषित हवेमुळे होणारे

 • श्‍वसन रोग ०० ९१७

 • स्वाइनफ्लू २४७ १०

नगरसेविका बारणे यांचे निधन डेंगीमुळे नाही

थेरगाव येथील नगरसेविका अर्चना बारणे यांचे मंगळवारी (ता. १३) खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांचा मृत्यू डेंगीने झाल्याचे रुग्णालयाने कळविले होते. मात्र, त्यांचा रक्तजल नमुन्याची महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) सेंटिनल सेंटरमध्ये तपासणी केली. त्यांचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. त्यानुसार बारणे यांचा मृत्यू डेंगीमुळे झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली. थेरगाव परिसरामध्ये एक हजार २५९ घरांचे सर्वेक्षण केले आहे. डास नियंत्रणाबाबतची कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

पॉझिटिव्हिटी दर ४.९६ टक्के

शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्याने निर्बंध कायम राहिले. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य दुकाने दुपारी चारपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत सरासरी पॉझिटिव्हिटी दर कधी पाच टक्क्यांपेक्षा कमी, तर कधी अधिक राहिला आहे. सरासरी तो ४.९६ टक्के आहे. त्यामुळे अजूनही निर्बंध कायम आहेत. पॉझिटिव्हिटी दरानुसार सरकारने राज्यातील जिल्हे व शहरांची पाच भागात विभागणी केली आहे. त्यासाठी पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजनवरील रुग्ण विचारात घेतली जाते. सरकारच्या निर्णयानुसार, अनलॉकसाठी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असायला हवा. गेल्या पंधरा दिवसांपासून शहराचा दर पाच टक्क्यांच्या आसपास राहिला आहे.

दृष्टिक्षेपात रुग्ण (१ ते १६ जुलै)

 • एकूण तपास ७४,२३४

 • पॉझिटिव्ह रुग्ण ३,७८३

 • डिस्चार्ज रुग्ण ३,९५५

 • शहरातील मृत्यू ३०

वयोगट व कर्मचारी लसीकरण

(१ ते १६ जुलै)

 • १८ ते ४४ वय १,९५,२५१

 • ४५ पेक्षा अधिक .. ५७,६४०

 • आरोग्य व फ्रंटलाइन १५,८६४

 • एकूण डोस २,६८,७५५

दृष्टिक्षेपात एकूण लसीकरण

(१६ जुलैपर्यंत)

 • कोव्हिशिल्ड ८,२१,६४४

 • कोव्हॅक्सिन ७८,९५८

 • स्फूटनिक व्ही ३४७६

loading image